संग्रहित छायाचित्र
न्यूझीलंड संघाने बंगळुरू आणि पुणे येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचा पराभव करून प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली. दुसरीकडे, टीम इंडियाने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. पण आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ॲण्ड कंपनीला हा पराभव विसरून विजयासह माकेचा शेवट गोड करायचा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी हा कसोटी सामना खास असणार आहे.
भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ११ वर्षांनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये कसोटी सामना खेळणार आहे. रोहित शर्मासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील शेवटची कसोटी खूप खास होती. त्या कसोटीत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावमाना १११ धावांची नाबाद खेळी केली होती. यात ३ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा कसोटी सामना होता. त्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १२६ धावांनी पराभव केला होता. रोहितला मुंबईत ११ वर्षांनंतर पुन्हा याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळायला आवडेल.
३७ वर्षीय रोहित आतापर्यंत एकूण ६३ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने १०९ डावांमध्ये ४२.८ च्या सरासरीने ४,२४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत.