संग्रहित छायाचित्र
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामने गमावण्याची नामुष्की पत्करल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघव्यवस्थापन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी तिसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी ऐन दिवाळीतही कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या दिगज्जांसह सर्व खेळाडूंना दिवाळीच्या नावाखाली सुटी न घेता सराव अनिवार्य केला आहे.
तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० अशी गमावली आहे. तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईत होत आहे. ही कसोटी जिंकून क्लीन स्वीप पत्करण्याची नामुष्की यजमान भारताला टाळायची आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील आव्हान जिवंत राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळे संघव्यवस्थापनाने सीनियर्ससह कोणत्याही खेळाडूला सरावातून सूट न देण्याचा निर्णय घेतला.
१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई कसोटीसाठी सर्व खेळाडू तयारी करतील, असे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने वैकल्पिक प्रशिक्षण सत्रे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडिया ३० आणि ३१ ऑक्टोबरला मुंबईत सराव करेल. या सत्रात सर्व खेळाडूंना उपस्थित राहावे लागणार आहे. ‘‘रोहित, विराट, जडेजा आणि बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनाही दिवाळीत विश्रांती मिळणार नाही,’’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून मुंबई कसोटी भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित सहापैकी चार कसोटी सामने जिंकणे अनिवार्य आहे. यापैकी पाच कसोटी सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका ऑस्ट्रेलियात खेळायची आहे. तेथे सकारात्मक मानसिकेने जाण्यासाठी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध होणारी तिसरी आणि अंतिम कसोटी जिंकणे भारतासाठी महत्वाचे असेल. न्यूझीलंडचा संघ क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला तर डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचणे भारतासाठी कठीण होईल.
पर्यायी सराव सत्र सहसा सामन्यापूर्वी आयोजित केले जाते. यामध्ये खेळाडूला सराव न करण्याचा पर्याय असतो. ज्या खेळाडूंना सरावाची गरज आहे ते या सत्रात सहभागी होतात. उर्वरित खेळाडू हॉटेलमध्ये विश्रांती घेतात. सामन्यापूर्वी, खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. आवश्यक सराव सत्र दोन सामन्यांमध्ये अंतर असताना आयोजित केले जाते. या सत्रात संघातील सर्व खेळाडूंनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात यजमान भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. बंगळुरु येथे झालेल्या सामन्यात भारताला आठ विकेटने पराभव पत्करावा लागला. पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी भारताला ११३ धावांनी धूळ चारत मालिकेत विजयी आघाडी घेतली. ही लढत अवघ्या साडेतीन दिवसांत संपली. या दौऱ्यात न्यूझीलंडच्या संघाने शानदार कामगिरी करीत भारतामध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.