संग्रहित छायाचित्र
मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज केन विल्यमसन भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या लढतीतही खेळणार नाही. कंबरेच्या दुखापतीतून अद्यापही न सावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या वतीने माहिती देताना विल्यमसन भारताविरुद्ध मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भाग घेणार नसल्याचे सांगण्यात आले. न्यूझीलंड संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मायदेशात परत येऊ शकतो. २८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, ‘‘विल्यमसन दुखाापतीतून सावरत आहे. परंतु तो मॅचफिट झालेला नाही. आम्हाला त्याच्याबाबत धोका पत्करायचा नाही. न्यूझीलंडमध्ये राहणे आणि पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे हे त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे, जेणेकरून तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरुस्त राहू शकेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला अजून एक महिना बाकी आहे. अशा परिस्थितीत त्याला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.’’
विल्यमसन नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. पुनर्वसनासाठी तो न्यूझीलंडला परतला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पुनरागमन करेल, अशी आशा संघाला होती.
न्यूझीलंडने ६९ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर भारताकडून कसोटी मालिका जिंकली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी १९५५ मध्ये खेळली गेली होती. बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला. पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा त्यांनी ११३ धावांनी धुव्वा उडवला.