अखेर प्लेऑफची कोंडी फुटली...
#मुंबई
आयपीएलच्या १६ व्या हंगामात प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांचे संपूर्ण चित्र चक्क अखेरच्या साखळी सामन्यानंतर स्पष्ट झाले. रविवारी (दि. २१) रात्री गुजरात टायटन्सने राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत केल्यानंतर गुजरातसह चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफमध्ये खेळणार असल्याचे निश्चित झाले.
गुजरात, चेन्नई आणि लखनौ हे संघ अखेरच्या साखळी सामन्यापूर्वी प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. मुंबईचा प्लेऑफमधील प्रवेश गुजरात-बंगलोर सामन्याच्या निकालावर अवलंबून होता. गुजरातने बंगलोरचा पराभव केल्याने मुंबईला प्लेऑफचे तिकीट मिळाले. तब्बल ५२ दिवसांपासून १० संघांमध्ये मैदानावर लढत सुरू होती. ७० सामन्यांनंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. उर्वरित सहा संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आले. मंगळवारपासून (दि. २३) प्लेऑफच्या लढतींना सुरुवात होणार आहेत. त्याच दिवशी गुजरात आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायर १ चा सामना होणार आहे, तर बुधवारी (दि. २४) लखनौ आणि मुंबई या संघामध्ये एलिमिनेटर सामना होईल. क्वालिफायर १ मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजयी संघ यांच्यात शुक्रवारी (दि. २६) क्वालिफायर २चा सामना रंगणार आहे. क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ मधील विजयी संघ रविवारी (दि. २८) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदासाठी झुंजतील.
थेट प्रसारण कुठे?
आयपीएल-१६च्या प्लेऑफमधील सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ वर उपलब्ध असेल. त्यासोबत स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
लखनौ-मुंबई एलिमिनेटर
चेपॉक स्टेडियमवर लखनौ आणि मुंबई यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. यातील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील पराभूत संघाला एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला संघ क्वालिफायर २ मध्ये पोहचेल. त्याचा सामना एलिमिनेटरमधील विजेत्या संघासोबत होणार आहे.
चेन्नई-गुजरात यांच्यात आज क्वालिफायर १
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर १ चा सामना होणार आहे. गुजरातने सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे, तर चेन्नईने आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मान मिळवला आहे. साखळी फेरीत गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकून २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. १४ सामन्यांत १७ गुण मिळवणारा चेन्नई संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी चेपॉक स्टेडियमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई घरच्या मैदानावर हार्दिक पांड्यासोबत दोन हात करणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघासोबत क्वालिफायर २ मध्ये खेळेल.
वृत्तसंस्था