इंग्लंडच्या रेहान अहमदला राजकोट विमानतळावर अडवले

राजकोट: इंग्लंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा व्हिसामुळे अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी लेगस्पिनर रेहान अहमदला सोमवारी (दि. १२) राजकोटच्या हिरासर विमानतळावर थांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.

 RehanAhmedwasstoppedatRajkotairport

इंग्लंडच्या रेहान अहमदला राजकोट विमानतळावर अडवले

योग्य कागदपत्रांअभावी रेहानला विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले. त्याला इंग्लंड संघासह विमानतळाबाहेर जाऊ दिले नाही. तो अबुधाबीहून आपल्या टीमसोबत परतत होता. काही वेळानंतर हे प्रकरण स्थानिक व्यवस्थापनाने हाताळले आणि रेहानला टीम हॉटेलमध्ये पाठवण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून यातील तिसरा सामना गुरुवारपासून (दि. १५) राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. रेहान या कसोटीत खेळणार आहे.  दोन सामन्यांनतर काही दिवसांचा ब्रेक असल्यामुळे इंग्लंडचा संघ अबुधाबीला गेला होता. तेथून परतत असताना रेहानकडे फक्त सिंगल एन्ट्री व्हिसा असल्याने त्याला थांबवण्यात आले. २४ तासांत रेहानची व्हिसाची समस्या दूर होईल, अशी आशा इंग्लंड संघव्यवस्थापनाने व्यक्त केली.  

 बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड संघाला पुढील दोन दिवसांत पुन्हा व्हिसासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. या खेळाडूला (रेहान) संघासह देशात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, रेहानने मंगळवारी (दि. १३)  राजकोटच्या क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लिश संघासोबत सरावदेखील केला.

 रेहान अहमद भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंतचे दोन्ही सामने खेळला आहे. यात त्याने ८ विकेट्स घेण्यासोबत ७० धावाही केल्या. दुसरीकडे, शोएब बशीरने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात ४ विकेट घेतल्या. जॅक लीच दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर आता हे दोघे तिसऱ्या कसोटीतही खेळणार, हे निश्चित झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest