छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्य सरकारने २०० विद्यार्थ्यांनाच छात्रवृत्ती देण्याची मर्यादा वाढविण्याची मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपुात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter sessions)‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?’ असा थेट सवाल विचारल्याने सभागृहच अवाक् झाले.
आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंगळवारी (दि. १२) विधानपरिषदेत सारथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार यांनी ‘‘पीएचडी करून काय दिवे लावणार,’’ असा अनाकलनीय सवाल त्यांना केला. यावर सतेज पाटील म्हणाले, ‘‘असं काय बोलता दादा? सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांच्या योजनेमुळे महाराष्ट्रात पीएचडीधारकांची संख्या वाढणार आहे. त्याचा राज्याला फायदाच होणार आहे.’’
त्यापूर्वी सतेज पाटील यांच्या मागणीसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘ या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात. त्यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच त्या प्रकाशित केल्या जातील. सुरुवातीला २०० हून अधिक विद्यार्थ्यांना पीएचडीची शिष्यवृत्ती दिली जाईल, असे ठरले होते. मात्र, राज्यात होत असलेल्या पीएचडी आणि त्यांची राज्याला, समाजाला आणि शैक्षणिक क्षेत्रातील एकूणच उपयुक्तता याचा अभ्यास राज्य सरकारद्वारे करण्यात आला. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमण्यात आली. ही समिती आता हे निर्णय घेते. सदस्यांची आग्रहाची भूमिका लक्षात घेता ही शिफारस समितीकडे केली जाईल. मात्र, ती मान्य होईलच याची खात्री नाही. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?’’ काही जण तर नेत्यांवरच पीएचडी करण्यात व्यस्त आहेत, असा टोला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यावर अजित पवार म्हणाले, ‘‘त्यापेक्षा तरुण हुशार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे. यंदा संस्थेतर्फे सुविधा देण्यात आलेल्यांपैकी १७ जण यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.’’
सारथी, बार्टी, महाज्योती आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी
सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांच्या राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात येणारी सामाईक पात्रता आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या तिन्ही संस्थांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) दरवर्षी संशोधन विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिष्यवृत्ती म्हणजेच फेलोशिप प्रदान करतात. यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्तेवर आधारित मुलाखत घेण्यात येते. त्यासाठी सारथी, बार्टी आणि महाज्योतीने येत्या रविवारी (दि. १७) ही परीक्षा जाहीर केली आहे. पण, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीही परीक्षा आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून लाखो उमेदवार तयारी करत आहेत. मात्र, सर्व परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे.
परीक्षार्थी निखिल मगर म्हणाले, ‘‘आतापर्यंत सारथीच्या वतीने मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जात होती. आता योग्य वेळी मला सारथीकडून गुरुवारी (दि. ७) कळविण्यात आले की सीईटी परीक्षा १७ डिसेंबर रोजी होणार आहे. एमपीएससीची परीक्षाही त्याच दिवशी असल्याने संभ्रमात आहे.’’
सचिन फुलमाळी म्हणाले, ‘‘एमपीएससी ग्रुप सी परीक्षा आणि महाज्योती पीएचडी फेलोशिप सीईटीचीही तयारी मी करत आहे. आता कोणत्या परीक्षेला बसायचे या संभ्रमात माझ्यासारखे अनेकजण आहे. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय जाहीर करावा.’’
सारथीचे कुलसचिव संजीव जाधव म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या निर्देशानुसार सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्येच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’’
यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी ‘सीविक मिरर’ने बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध झाले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.