संग्रहित छायाचित्र
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे खासदार प्रणिती शिंदेंवर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या पराभवाला सर्वस्वी प्रणिती शिंदे जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी जाणूनबुजून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला. प्रणिती शिंदेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता, तर त्यांनी पंधरा दिवसांअगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता. खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही. समन्वय ठेवला नाही, त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अगदी अल्प मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान अवताडे यांचा विजय झाला. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित होते, परंतु ऐनवेळी भगीरथ भालके यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देऊन सर्वांना बुचकळ्यात टाकले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार झाले आणि मतांची विभागणी झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे मैदानात होते. तिघांच्या लढतीत भाजपला आपोआप फायदा झाला, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे.
बालेकिल्ला असणारा मतदारसंघही राखू शकल्या नाहीत
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मागील पंधरा वर्षांपासून आमदार होत्या. मुस्लीम, पद्मशाली आणि मोची या समाजाची मतदार संख्या अधिक आहे. २००९, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा प्रणिती शिंदे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात उमेदवार मुस्लीम, पद्मशाली किंवा मोची या समाजापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.