संग्रहित छायाचित्र
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपकडून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम यंत्रावरील मतदानाची फेरपडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ९४ हजार ४०० रुपयांचे शुल्क त्यांनी भरले आहे. कोठे यांनी फेरपडताळणीसाठी कायदेशीर देय असलेले ९४ हजार ४०० रुपयांचे चलन प्रशासनाकडे भरले आहे. एका ईव्हीएम यंत्रामागे ४० हजार रुपये अधिक १८ टक्के जीएसटी याप्रमाणे कोठे यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात संपूर्ण चलन भरले आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना डिपॉझिट दहा हजार रुपये आणि फेरमतमोजणीसाठी ४७ हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. म्हणजे कोणी फेरमतमोजणीची मागणीच करू नये, असा त्यामागचा उद्देश दिसून येतो. ज्या बूथमध्ये संशय आहे तिथल्या मशिनची तपासणी करण्याची मागणी केली मात्र त्या मशिनची तपासणी न करता नवीन मशिन तपासून घ्या, असे निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. त्यांचे हे नियम संशयास्पद वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पराभूत उमेदवार महेश कोठे म्हणाले आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.
महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव ईव्हीएम मशिनमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांची माहिती देण्यासाठी शनिवारी (दि. ३०) त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
कोठे म्हणाले की, मी गेल्या ३० वर्षांपासून जुना विडी घरकुलमध्ये विकासकामे केली आहेत. त्या परिसराचा चेहरा मोहरा बदलला. अशा ठिकाणी सर्व जनता माझ्या विरोधात जाईल का? अनेक मतदार माझ्यासाठी स्वखर्चाने परगावातून सोलापुरात आले. माझ्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले होते. इथून मला मताधिक्य मिळालेले नाही हे कसे शक्य आहे. विडी घरकुलची जनता जर मला नाकारत असेल तर मी राजकारणातून बाहेर पडणे योग्य राहील.
हा सर्व ईव्हीएमचा घोटाळा आहे. मतमोजणीच्या दिवशी जाहीर होत असलेल्या आकडेवारीमध्ये तफावत आढळून येते. मी फेरमतमोजणीसाठी ९४ हजार रुपये भरले आहेत. पुढे फेरमोजणी होईल. सध्या जो प्रकार सुरू आहे तो लोकशाहीचा खून आहे. अक्कलकोटमध्ये बंडगर नावाचा उमेदवार आहे. त्याच्या बूथमध्ये स्वतःचेही मत त्यांना पडलेले नाही.
अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली . त्यात काहीही घोळ नसेल तर जनतेसमोर स्पष्ट चित्र येऊ द्या. लाडकी बहीण योजनेमुळे हे यश आहे, असे सांगितले जात आहे. मात्र या योजनेच्या नावाखाली ईव्हीएमचा घोळ पचवण्याचा प्रकार होत आहे. या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कोठे म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.