संग्रहित छायाचित्र
शिर्डी : मी तुम्हाला पुढचे भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील, हे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केले आहे, त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.
रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून पुढील दोन दिवसांत सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षांत लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.