लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : हस्तिदंती मनोरे ठरले धोकादायक

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रमेश कराड यांनी काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव केला. कराड यांना १ लाख १२ हजार ५१ मते मिळाली, तर देशमुखांना १ लाख ५ हजार ४५६ मते मिळाली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रमेश कराड यांनी काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव केला. कराड यांना १ लाख १२ हजार ५१ मते मिळाली, तर देशमुखांना १ लाख ५ हजार ४५६ मते मिळाली. काँग्रेस आणि देशमुख घराण्याच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात असला तरी ग्रामीण मतदारसंघातील स्थानिक नागरिकांना हा निकाल अपेक्षित मानावा लागेल.

मुळात ग्रामीण लातूर मतदारसंघातील ही लढत काँग्रेसी सरंजामशाही संस्कृतीत फुललेल्या देशमुखांच्या घराण्यातून समोर आलेला युवराज विरुद्ध भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशीच होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतच खरेतर हा निकाल आला असता. मात्र देशमुखांनी फडणवीसांसोबतच केलेल्या गुप्त सहकार्यामुळे भाजपने आपल्याकडील मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात टाकला. त्यामुळे देशमुखांना पहिल्या निवडणुकीतच पराभूत होण्याची नामुष्की टाळता आली. औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारांना निवडून आणण्याच्या बोलीवर भाजपने ग्रामीण मतदारसंघात कराड यांना डावलले. ही जागा यत्किंचितही ताकद नसलेल्या शिवसेनेला सोडली. धीरज देशमुख या शर्यतीत एकटेच पळाले अन् निवडून आले.          

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात  होते. प्रमुख लढत ही  विरुद्ध काँग्रसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख आणि कराड  यांच्यात झाली. भाजपचे रमेश काशीराम कराड यांना १ लाख १२ हजार ५१ मते मिळाली, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांना १ लाख ५ हजार ४५६ मते घेऊन दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. डॉ. अजयनीकर विजय रघुनाथराव यांना तिसऱ्या क्रमांकांची ८८२४ मते मिळाली. लातूर ग्रामीण हा एक वेगळा मतदारसंघ म्हणून २००८ मध्ये स्थापन झाला.

देशमुखांच्या पराभवाची कारणे
सुदैवाने पहिल्यांदा विनाअडसर विधानसभेत पोहोचलेल्या धीरज देशमुखांना पाच वर्षांत म्हणावा तसा करिष्मा दाखवता आला नाही. ग्रामीण मतदारसंघ हा मांजरा पट्टा म्हणून ओळखला जातो. दिवंगत नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचा प्रभाव असणारा हा मतदारसंघ. ऊस आणि सोयाबीन उत्पादकी शेतकऱ्यांचा हा पट्टा. देशमुखांच्या घराण्यातील धीरज यांना मतदारसंघ आपलासा करता आला नाही. बंधू अमित देशमुखांप्रमाणेच हस्तिदंती मनोऱ्यातून मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचा अट्टाहास त्यांना या निवडणुकीत महागात पडला आहे. केवळ काँग्रेसच्या परंपरागत राजकारणापलीकडे जात मतदारसंघात संपर्क स्थापन करण्यात धीरज कमी पडले. आजवरच्या राजकारणाला छेद देत थेट मतदारांशी जोडले जाणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. धीरज यांचा संपर्क त्यांच्यासमोर गोड बोलणाऱ्या खुशमस्कऱ्यांपुरताच मर्यादित राहिला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढीव एफआरपीची अपेक्षा असो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला असता तर कदाचित धीरज हे वेगळे नेते आहेत. देशमुखांप्रमाणे मुंबईत बसून नेतृत्व करणारे नाहीत, हा संदेश गेला असता. पहिल्यांदा भलेही ते भाजपसोबत सहकार्य करून 'नोटा'च्या विरोधात निवडून आले असले तरीही मतदारसंघात स्वतःला प्रस्थापित करण्याची संधी त्यांनी घालवली. इतर नेत्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, जमिनीवर पाय ठेवून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, हा संदेश पोहोचवण्याची संधी त्यांनी घालवली. या तुलनेत जमिनीवर पाय ठेवून असणारा प्रतिस्पर्धी त्यांना जड गेला यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पराभवानंतरही सातत्याने मतदारसंघात तळ ठोकणारे, खेड्यापाड्यातील- वाड्यावस्त्यातील लोकांच्या नित्य संपर्कात असणारे रमेश कराड धीरज देशमुखांना जड गेले, ही वस्तुस्थिती आहे. तर पहिल्याच विजयानंतर पुढचा विजय काँग्रेसी पद्धतीच्या राजकारणावर मिळवता येईल, या भ्रमात देशमुख अडकले, हेदेखील वास्तव आहे.      

रमेश कराड यांच्या विजयाची कारणे
२००९ साली निर्माण झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात विलासराव देशमुख यांनी वैजनाथराव शिंदे या त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली. यावेळी रमेश कराड यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यानंतरही कराड यांनी मतदारसंघाशी असलेला संपर्क तुटू दिला नव्हता. २०१४ साली या मतदारसंघातून काँग्रेसकडून त्र्यंबक भिसे मैदानात होते. या निवडणुकीतही कराडांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. या सलग दुसऱ्या पराभवानंतरही कराड यांनी मतदारसंघाकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट आपला जनसंपर्क वाढवला. मतदारसंघातील खेड्यापाड्यात जात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. २०१९ ला मात्र भाजपने कराड यांचा मतदारसंघ शिवसेनेला सोडला आणि धीरज देशमुखांचा विजय सोपा केला.  या काळातही कराड यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली नाही. उलट मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विजयामागे त्यांचा संपर्क हे जसे कारण आहे तसेच ग्रामीण मतदारसंघातील पक्षकार्यकर्त्यांची एकजूट हीसुद्धा कारणीभूत आहे. मतदारसंघातील भल्या-बुऱ्या प्रसंगाला धावून जाणारा नेता, ही त्यांची ओळख लक्षात घेत अटीतटीच्या लढतीत मतदारांनी आपला कौल त्यांच्या पारड्यात टाकला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest