संग्रहित छायाचित्र
गेली ४० वर्षे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. हा निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित होता. कारण तसं बघितलं तर समोरचा महायुतीचा उमेदवार हा केवळ एक कार्यकर्ता होता. या कार्यकर्त्याने साधी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढलेली नव्हती. मात्र घोळ इथेच झाला. समोरच्या उमेदवाराचं कार्यकर्ता असणंच थोरात यांना नडलं आणि त्यांना दहा हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
हा समोरचा उमेदवार होता ४१ वर्षीय अमोल खताळ पाटील. खताळ यांनी चाळीस वर्ष आमदार असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरुंग लावला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निकाल अनपेक्षित होता. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव घेतलं जायचं. इतकच नाही तर मतदारसंघात थोरात यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स देखील लावले होते. मात्र खताळ यांनी सलग आठ वेळा निवडणूक जिंकलेल्या बाळासाहेब थोरात यांचा नवव्या वेळी पराभव केला. आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवर दोन मुद्दे गाजले. एक लाडकी बहीण योजना आणि दूसरा मुद्दा हिंदुत्व. या सोबतच ओबीसींचा अंडरकरंट असल्याचं देखील मानलं जातं. मात्र संगमनेर विधानसभेत ज्या कारणामुळे थोरात पडले आणि खताळ जिंकले यासाठी काही स्थानिक मुद्यांची देखील दखल घायला हवी.
पहिला मुद्दा पाण्याचा. प्रवरा नदीचा पट्टा सोडला तर साकुर पठार आणि तळेगाव निमोण परिसरातील लोकांना नेहमीच पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय. विशेषता: तळेगाव निमोण गटामध्ये निळवंडे धरणातून येणारा प्रस्तावित कालवा या दुष्काळी भागातून न गेल्यामुळे या भागातील लोकांच्या मनात थोरातांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. ही नाराजी यावेळी मतदानातून दिसली. या परिसरात राहणाऱ्या मराठा, तसेच ओबीसी समाजाने थोरात यांच्या विरोधात मतदान केल्याचं दिसलं. या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.
संगमनेर मतदारसंघातील गावागावांमध्ये असलेला दूसरा प्रश्न रस्त्यांचा. दूर खेड्यांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तरूणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. संगमनेर शहर वगळता परिसरात नोकरीच्या संधी उपलब्ध नाही. संगमनेर शहरातील नोकरीच्या संधी देखील मर्यादित आहे. अनेक महत्त्वाच्या संस्था या थोरात यांच्या निकटवर्तीयांच्या ताब्यात आहे. इतकेच नाही या संस्थांमध्ये थोरात यांच्या समर्थकांनाच नोकरीत प्राधान्य दिले जाते असा आरोप देखील केला जातो. तसंच इतरांनी संगमनेर परिसरात नोकऱ्या निर्माण करणं थोरात यांच्या जवळच्या लोकांना आवडत नसल्याचा आरोप या परिसरात केला गेला. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात उभारलेल्या एका आयटी कंपनीच्या कामात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्याचा देखील आरोप झाला. थोरात यांच्या निकटवर्तीयांच्या स्टोन क्रशर्समुळे गावंच्या गावं उध्वस्त झाल्याचं देखील बोललं गेलं. या सगळ्यांमुळं वातावरण थोरात यांच्या विरोधात फिरत गेलं. मात्र थोरात यांच्या तालुक्यातील दबदब्यामुळं या विरोधात कधी कोणी आवाज उठवला नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
ऐन प्रचारात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत धांदरफळच्या वसंतराव देशमुख यांनी मुक्ताफळं उधळली. देशमुख यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संगमनेर तापले. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. या तापलेल्या वातावरणात गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेचा महायुतीकडून पुरेपूर फायदा घेण्यात आला. देशमुख यांच्या विधानाबद्दल कायदेशीर मार्गाने जावू शकले असते मात्र थोरात समर्थकांनी तसे न करता जाळपोळ केली असा प्रचार करण्यात आला. इतकेच नव्हे निकाल जाहीर झाल्यावर काढलेल्या मिरवणुकीत ती जळालेली कार देखील आणली गेली.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राजकारणातला एक अलिखित नियम म्हणजे एका राजकीय नेत्याने दुसऱ्याच्या मतदारसंघात लुडबूड करायची नाही. थोरात यांनी हा नियम मोडला आणि दक्षिण नगरमध्ये लोकसभेत सुजय विखे यांच्या विरोधात रसद पुरवली. सुजय विखे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. कोणी कितीही नाकारले तरी विखे यांच्या मनात याबद्दल सल होतीच. आणि त्यामुळेच संगमनेरमध्ये विखे पूर्ण ताकदीने उतरल्याचे दिसले. थोरातांनी देखील शिर्डी मध्ये विखे यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र विखे यांनी संगमनेर मध्ये प्रचार करत असताना स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होवू दिलं नाही. मात्र थोरातांनी ही निवडणूक हलक्यात घेतली. राज्य पातळीवर महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना त्यांचं स्वत:च्या मतदार संघात मात्र दुर्लक्ष झालं. त्यांच्या विरोधात असलेली मात्र आज पर्यंत व्यक्त न होवू शकलेल्या नाराजीला विखे यांच्या पाठबळामुळं तोंड फुटलं. आणि या निवडणुकीत थोरात यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. थोडक्यात ग्राऊंड लेव्हलला काय चाललंय हे थोरातांना कळलंच नाही असं म्हणायला देखील वाव आहे.
दुसरीकडे, अमोल खताळ यांनी गेली काही वर्षे संजय गांधी निराधार योजनेचे संगमनेर तालुका प्रमुख, तसेच भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना मोठ्या प्रमाणात जनसंपर्क निर्माण केला. विखेंचं पाठबळ त्यांना मिळालं. गाव खेड्यात जावून दारोदारी प्रचार करणं त्यांना फायद्याचं ठरलं. तसंच संगमनेर तालुक्यात विखे यांची प्रतिमा ही सकारात्मक असल्यामुळे त्यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खताळ यांना पाठिंबा मिळत गेला. सुजय विखे यांनी मोठ्या नेटाने आणि योग्य रणनीती आखत संगमनेरमध्ये प्रचार केला आणि त्याचं रूपांतर थोरात यांच्या पराभवात झाल्याचं बघायला मिळालं.