पुण्यातील आमदारांना मंत्रिपदाचे वेध

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. असे असतानाच पुण्यातील आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यातून माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल यांची नावे चर्चेत

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. असे असतानाच पुण्यातील आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.

नवीन मंत्रिमंडळामध्ये पुण्यातील तीन जणांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतरांनीदेखील मंत्रिपदाची माळ गळ्यात घालून घेण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू केली आहे.  अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांचे मंत्रिपद निश्चित आहे. याव्यतिरिक्त मंत्रिपदासाठी माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल यांच्या नावाची चर्चा आहे.

राज्याच्या विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे. महायुतीच्या तीन पक्षात भाजप हा १३२ जागा जिंकून सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. २६ नोव्हेंबर रोजी चौदाव्या विधानसभेची मुदत संपुष्टात आल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या राजीनाम्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी १८ जागा महायुतीला तर केवळ दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले असून मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी भाजपसह शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे.

तिन्ही पक्षातील विजयी उमेदवारांची संख्या वाढली आहे. अद्याप महायुतीचा मंत्रिपदाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात आलेला नाही. अधिकाधिक मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जाणार आहे. आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावे, यासाठी जुळवणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील या तिघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, हे निश्चित आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदासाठी  शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासोबतच खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांची तर पिंपरी-चिंचवडमधून भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांचीही नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित झाल्यानंतर इतर मंत्रिपदे ठरणार आहेत. मुख्यमंत्रिपदानंतर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार हे निश्चित होईल. तोवर या तीनही पक्षांतील इच्छुकांनी मंत्रिपदावर संधी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

भरणे, शिवतारेदेखील इच्छुक
इंदापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी    मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव केला आहे. त्यामुळे भरणे यांचादेखील मंत्रिपदावर दावा आहे, तर दुसरीकडे पुरंदरचे  शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. तेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पुण्यात शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे शिवसेना हा पक्ष कसा वाढणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पक्ष बळकट करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्याला ताकद देण्यासाठी शिंदे यांच्याकडून माजी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या शिवतारे यांच्या नावाचा पुन्हा एकदा विचार करू शकतात, असे सांगितले जात आहे.

यापूर्वीही होते मिसाळ यांचे नाव शर्यतीत
यापूर्वीदेखील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मिसाळ यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात ते मागे पडले होते. पुण्यातून आमदार झालेल्या त्या एकमेव महिला असल्याने यावेळी त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुनील कांबळे हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून निवडून आले असल्याने या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो. गेल्या सरकारच्या काळात मिसाळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदासाठी गळ घातली होती. मात्र त्यावेळी मंत्रिपद देण्यात आले नव्हते. आता स्पष्ट बहुमत मिळाल्याने मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याचा विश्वास आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest