संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभव आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. नेमके काय झाले तेच आम्हाला समजत नाही. मात्र महाराष्ट्रातील या पराभवावर विचारमंथन केले जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील प्रभाव हा केवळ काँग्रेसचा पराभव नसून महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पराभवाची कारणे शोधण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र आणि हरियाणातील पराभवानंतर एकंदर निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आम्ही आश्चर्यात पडलो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये हादरे बसले आहेत. थोडक्यात हा महाविकास आघाडीचा पराभव आहे. पराभवाच्या कारणांचे सामूहिक आत्मचिंतन केले जाईल. पराभव ताजा असताना निवडणूक प्रक्रियेत गोधळ झाल्याचे आरोप करणार नाही, अशी टिप्पणी वेणुगोपाल यांनी केली. अथक परिश्रमामुळे वायनाडमध्ये विजय केरळमधील वायनाड येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना वेणुगोपाल म्हणाले, नेते आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रियांका यांचा जास्त मताधिक्याने विजय होईल, याची आम्हाला खात्री होती
इंडिया आघाडीबाबत पुनर्विचार करण्याची गरज
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या एकूण ऐक्याला व काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागण्याची शक्यता असून दिल्लीच्या राजकारणात भाजपची निवडणूक व्यवस्थापनातील निपुणता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 'इंडिया' आघाडीचा झालेला उदय पुन्हा अस्ताला जाऊ लागला आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांनी झालेल्या हरियाणा निवडणुकीच्या निकालाने हे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु महाराष्ट्राचे दिल्लीच्या राजकारणातील स्थान लक्षात घेऊन या निकालाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. अपयश पचवण्याच्या क्षमतेचा अभाव व निवडणूक व्यवस्थापनातील गोंधळ हा काँग्रेसचा स्थायीभाव झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला महाराष्ट्रात १८५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. परंतु केवळ सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १३५ मतदारसंघातून हद्दपार व्हावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १० पैकी ५ मतदारसंघात विजय मिळाला होता व ४५ मतदारसंघात आघाडी घेतली होती. परंतु चार महिन्यांनी झालेल्या विधानसभेत मात्र केवळ ३६ मतदारसंघांतील आघाडीवर समाधान मानावे लागले. काँग्रेस बळकट असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांना फायदा मिळत नाही व भाजपविरुद्धच्या थेट लढतीत काँग्रेस भाजपचा सामना करू शकत नाही, हे अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीने काँग्रेसने जमा केलेली पुंजी आता आटत असल्याचे चित्र देशाच्या राजधानीत दिसून येत आहे. यामुळे या पुढील 'इंडिया' आघाडीतील बैठकांमध्ये काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष असेल.