संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचे वृत्त होते. या पदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात होते. या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, मी काहीही ताणून ठेवलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेला निर्णय मला मान्य असेल. तसेच सत्तास्थापणेसाठी आमच्या मुळे कोणतीही अडचण होणार नाही असा विश्वास पंतप्रधानांना दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उद्या दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून शिंदे यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.