संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय राजकारणातील इंडिया आघाडी जशी लोकसभेनंतर खिळखिळी झाली आहे तीच अवस्था विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर महाविकास आघाडीची झाली आहे. या पराभवाचे विशेषण करण्यासाठी आयोजित बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या आमदारांनी आणि पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने पराभवाची कारणे शोधण्यासाठी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. यामध्ये पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे देताना सर्वांत आधी पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्रपक्षांनी दगा दिल्यानेच आपल्याला पराभव पत्करावा लागला असल्याचे कबूल केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली कामे केली नसल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा अनुभव उद्धव ठाकरे यांना सोलापुरात आलेला आहे. सोलापुरातील उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारापासून सुरुवातीला अलिप्त राहिलेल्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना विनंती करूनही त्यांनी 'उबाठा' उमेदवाराचा प्रचार केला नाही. आदल्या दिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळेच शिवसेनेच्या सर्वच पराभूत नेत्यांनी आता काँग्रेससोबत सहकार्य करणे थांबवण्याचा आग्रह उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू, असे म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी होत असली तातडीने असे काही लगेचच घडेल याची शक्यता फार कमी आहे. कारण विधिमंडळात महाविकास आघाडीची ताकद कमी आहे. त्यामुळे तिथे त्यांना एकत्रित काम करावे लागणार आहे. आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवायचे असे तर सभागृहात काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ लागणार आहे. याखेरीज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पराभूत उमेदवारांवर आणि शिवसैनिकांना काही काळ 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सहन करावा लागणार आहे. निव्वळ स्वबळावर त्यांना स्थानिक निवडणुकांनाही सामोरे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे इच्छा असो वा नसो त्यांना महाविकास आघाडीत राहणे भाग पडणार आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तातडीने याबाबत काही घडेल याची शक्यता फार कमी आहे. मात्र याबाबतची भावना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये देखील आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांमधील अंतर वाढले आहे, हे नेत्यांच्या वक्तव्यांतूनही स्पष्ट होत आहे.
हिंदुत्व सोडणे पडले महागात
मराठी बाणा आणि हिंदुत्वाच्या मुद्दावरुन उभ्या राहिलेल्या शिवसेनेची सुरुवातीला दोन आणि आता तीन शकले झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही झाल्याचे पहायला मिळत आहे. मुस्लीम मतांचे पारडे आपल्याकडे झुकवण्यासाठी आणि मित्रपक्षांची मर्जी राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मूळच्या कट्टर हिंदुत्वाला दिलेली सोडचिठ्ठी महागात पडली असल्याची भावनाही या बैठकीत अनेक पराभूत उमेदवारांनी बोलून दाखवली आहे. त्यातच सुषमा अंधारे यांनी साधुसंतांचा केलेला अपमान शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना रुचला नसल्याची भावना मराठवाड्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंजवळ उघडपणे बोलून दाखवली आहे.