राज ठाकरे
पुणे शहर मनसेच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयांमध्ये आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पुणे शहरातील पदाधिकारी व विभागीय अध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. प्रामुख्याने प्रत्येक शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता त्यांनी संपूर्ण रामायण सांगितले. रामायणातील एका सेतूला बारा वर्ष लागले आणि महाराष्ट्रातील एका सिलिंकला दहा वर्ष लागले, असे विधान यावेळी त्यांनी केले.
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासाठी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर एका टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर अमित ठाकरे यांच्यावर भाजपने देखील टीका केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका पत्रकार परिषदेत बोलताना, अमित ठाकरे यांच्यासाठी केलेली तोडफोड चुकीची आहे, आपल्याकडे संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्याचे मार्ग आहेत. राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या बद्दल सरकार व असंवेदनशील नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न ऐकून घेतले असते. राज्याच्या उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी देखील त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता, असे बावनकुळे यांनी म्हटले होते.
यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “भाजपने टोलमुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा निवडणुकीच्या आधी दिली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले? बहिस्कर नावाचा हा लाडका कोण आहे? याची देखील विचारपूस करा. रस्ते बांधण्याआधीच यांचे टोल तयार असतात. समृद्धी महामार्गावर देखील आत्तापर्यंत ४०० अपघात झाले आहेत. याची जबाबदारी भाजप घेणार का?” असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.