हे तर कमिशनखोर, टक्केवारी सरकार !

हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरेतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Thu, 27 Jun 2024
  • 01:35 pm
Vijay Vadettiwar

हे तर कमिशनखोर, टक्केवारी सरकार !

अंत्यविधीच्या सामानावर १८ टक्के जीएसटी; शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे सरकार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरेतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. २०१३ मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तेच २०२४ ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महापापी महायुतीने केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती, पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा घणाघात बुधवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून)  सुरू होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते.  पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपण राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले.  यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली.  वडेट्टीवार म्हणाले की, हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर १८ टक्के जीएसटी लावते, दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना ५ टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना ३ टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना २ टक्के जीएसटी, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. जीएसटी कुठे लावावी हे या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचेही भान नाही. अंत्यविधीच्या प्रत्येक सामानावर सरकारने १८ टक्के जीएसटी लावली आहे. त्यामुळे आता या सरकारने मरणही महाग केले आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. युरियाची पिशवी ५० रुपयाला मिळायची. ती आता १५० रुपयांवर गेली आहे. तसेच ५० किलोची युरियाची पिशवी आता ४० किलोची केली. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त व्हावे, आत्महत्या करावी, हा चंगच या सरकारने बांधला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

उरलेल्या छातीतील हवा काढली

आम्हाला चहापानाचे निमंत्रण मिळाले. पण महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्ण खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. अभद्र युती, याला अनैतिक संगत म्हणतो, अशी युती आपल्याला या राज्यात पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. या सरकारवर ज्यांची उरलेल्या छातीतील हवा काढण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेने, मतदारांनी केले आहे. त्यामुळे आम्ही मतदारांचे आभार मानतो. चौदाव्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. जनाधार गमावलेले हे सरकार आहे. फार मोठ्या वल्गना केल्या की, १४५ जागा जिंकण्याचा आणि तीनही पक्षांची अवस्था सर्व महाराष्ट्राने पाहिली, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest