दानवेंचं निलंबन म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - सुषमा अंधारे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 2 Jul 2024
  • 05:33 pm
Political News, Ambadas Danve, Monsoon Session, Prasad Lad, Sushama Andhare

दानवेंचं निलंबन म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - सुषमा अंधारे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे  विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. तसेच शिवीगाळ केली. असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. 

यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या, दानवे यांचं आजचं निलंबन हे एका अर्थाने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. कारण जे संस्कृतीच्या नावाने गळे काढत आहेत, आणि ज्यांना अचानक संस्कृतीचे उमाळे फुटले आहे, त्यांना जर असे वाटत असेल की दानवे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तर मग जो न्याय अंबादास दानवे यांना आहे तोच न्याय याच्या आधीच्या लोकांना का बरं दिला गेला नसेल? 

अंधारे पुढे म्हणाल्या, संसदीय कामकाज चालू असताना  खासदार रमेश बिधूरी जे अत्यंत गालिच्छ आणि अभद्र भाषा त्यावर एकाही भाजपच्या माणसाने  रमेश बिधूरी यांचं निलंबन व्हावं याबद्दल का बरं चकार शब्द काढला नसेल? किंवा इथे महाराष्ट्रामध्ये आमदार अब्दुल सत्तारांनी अत्यंत गालिच्छ भाषा खासदार सुप्रिया सुळे यांच्या संबंधाने वापरलेली. किंवा संजय शिरसाट यांची उर्मट भाषा जर बघितली. तर त्या वेळेला सभापती महोदया स्वत: महिला आहेत. त्यामुळे महिला असलेल्या सभापती महोदयांनी महिला सम्मानासाठी का बरं आवाज उठवला नसेल? त्यामुळे आता सोयीनुसार आपला अधिकार वापरायचा आणि एखाद्याचं निलंबन करायचं याचा स्पष्ट अर्थ असा आहे, ज्या सत्ताधाऱ्यांना इथं लोकहिताचे प्रश्नच चर्चेला आणायचे नाहीयेत. आणि ज्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं देण्याची कुवत नाहीये त्यांच्याकडून जाणीवपूर्वक विरोधकांची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे. 

सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काही काळ कामकाज स्थगित करावं लागलं.  कामकाज सुरू झाल्यावर भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासंदर्भात ठराव मांडला. त्यानंतर  उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे  यांनी दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे. तसेच निलंबनाच्या कालावधीत दानवे यांना सभागृहात येण्यास बंदी असेल असंही सांगितलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest