‘शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतीलच असे नाही’- माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाकीत

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडी आक्रमक मूडमध्ये आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 1 Jul 2024
  • 01:49 pm
Political News, Lok Sabha elections

संग्रहित छायाचित्र

महायुतीत आणखी नवे सवंगडी जोडले जाण्याची व्यक्त केली शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत.  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडी आक्रमक मूडमध्ये आहे. मविआने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावे, अशी मागणी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झालाय. त्यातच भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षाचा प्लॅन सांगितला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवेल. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे नाही, असे दानवे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येणार का, या प्रश्नावर त्यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक उत्तर दिले आहे.

तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचे काही सूत्र असू शकतात. ज्यांनी जी जागा जिंकली आहे ती जागा त्या पक्षाला मिळेल. बाकीच्या जागेबद्दल विचार होऊ शकतो, असे दानवे यांनी सांगितले.  दानवे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला आहे, असा आरोप दानवे यांनी केला. दानवे यांनी यावेळी सत्तार यांच्या विरोधातील अनेक पुरावेही सादर केले. जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मागील पाच वेळा ही जागा जिंकणाऱ्या दानवे यांना यंदा विजयी सिक्सर लगावता आला नाही. त्यानंतर या पराभवाला अब्दुल सत्तारच जबाबदार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्याचबरोबर सत्तार यांनी देखील माझ्या कार्यकर्त्यांनीच दानवेंना पाडले असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही दानवे विरुद्ध सत्तार वाद पेटण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest