पिंपरी-चिंचवड: अजित पवारांचा गड ढासळणार? शहराध्यक्षांसह १६ माजी नगरसेवक पदाधिकारी 'राशप'च्या वाटेवर

बारामतीनंतर अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड शहर हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नीचा झालेल्या दारुण पराभवामुळे पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला देखील ढासळणार आहे.

Ajit Pawar

पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांसह १६ माजी नगरसेवक पदाधिकारी 'राशप'च्या वाटेवर, शरद पवारांची घेतली भेट, सहा जणांची नावे उघड

बारामतीनंतर अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड शहर हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नीचा झालेल्या दारुण पराभवामुळे पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला देखील ढासळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवकांनी शनिवारी (२९ जून) शरद पवार यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवडमधील तब्बल १६ माजी नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात लवकरच प्रवेश करणार आहेत.

यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांचादेखील समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत हे देखील उपस्थित होते.  तर राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरी कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक पंकज भालेकर, संजय वाबळे, राहुल भोसले, समीर मासुळकर, प्रवीण भालेकर, संजय उदावंत, आबा तापकीर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. त्यांचा ५ जुलैला प्रवेश होण्याची शक्यता आहे. परंतु, आम्हाला थोडा वेळ द्या, अशी अजित पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना विनंती केली आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निष्ठावंत समजले जाणारे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. अजित गव्हाणे यांच्यासह भोसरी विधानसभेसह इतर १५ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मोहरे हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. काही जण हे शिवसेना (उबाठा) गटाकडे देखील चाचपणी करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाला निश्चित बळ मिळणार आहे. अजित गव्हाणे महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यास भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.

अजित गव्हाणे यांनी इतर पक्षात देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती चाचपणी केल्याचे बोलले जात आहे. आधीच भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अजित गव्हाणे इच्छुक आहेत. भोसरी विधानसभा महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हेच उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अजित गव्हाणे हे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटात चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे.

चिंचवड आणि पिंपरीतही इच्छुकांची गर्दी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा चांगला करिष्मा पाहायला मिळाला. या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील अनेक चेहरे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपमधील अनेक चेहरे हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात अनेक भूकंप पाहायला मिळणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest