रावेर लोकसभा मतदारसंघ: भाजपने गड राखला!

एकनाथ खडसे यांच्यामुळे सध्याच्या रावेर आणि पूर्वीचा एरंडोल मतदारसंघात भाजप तसा मजबूत स्थितीत आहे. रावेरची निर्मिती झाल्यापासून तर भाजपने सलग चौथा विजय मिळवला आहे.

Lok Sabha Election 2024, Raver Loksabha, Eknath Khadse, Raksha Kahdse, Shriram Patil

संग्रहित छायाचित्र

एकनाथ खडसे यांच्यामुळे सध्याच्या रावेर आणि पूर्वीचा एरंडोल मतदारसंघात भाजप तसा मजबूत स्थितीत आहे. रावेरची निर्मिती झाल्यापासून तर भाजपने सलग चौथा विजय मिळवला आहे. 

एकनाथ खडसेंच्या घोषणा झालेल्या पण समारंभपूर्वक प्रवेश बाकी राहिलेल्या भाजप प्रवेशाने रावेरमधील महायुतीचे पारडे तसे जड होते. त्यातच खडसेंच्या सूनबाई रक्षा याच भाजपच्या उमेदवार असल्याने खडसेंचा विरोध सुरुवातीलाच मावळला होता. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीचा हात पकडल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. एकनाथ खडसे रिंगणात उतरले असते तर ही निवडणूक चुरशीची झाली असती. शरद पवार यांनी हेच गणित मांडून हा मतदारसंघ जागावाटपात मागून घेतला होता. मात्र, तत्पूर्वीच खडसेंची भाजपवापसी झाल्याने निवडणुकीचे गणित बदलले. 

मतदारसंघाचा इतिहास 

२०२४ मध्ये विजयाची हॅटट्रीक टप्प्यात असलेल्या भाजपच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीच्या नवख्या श्रीराम पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत विजय मिळवला आणि दिल्ली गाठली. रक्षाताईंना ६ लाख ३० हजार तर राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांना ३ लाख ५८ हजार मते मिळाले. रक्षाताईंचे मताधिक्य २ लाख ७२ हजार एवढे होते. २०१९ मध्ये रक्षाताईंनी ६ लाख ५५ हजार मते घेतली होती. त्यावेळी विरोधात काँग्रेसचे उल्हास पाटील होते. त्यांना ३ लाख १९ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यावेळी रक्षाताईंचे मताधिक्य ३ लाख ३५ हजार एवढे होते. यावेळी वंचिततर्फे नितीन कंदिलकर यांनी निवडणूक लढवताना ८८ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. २०१४ मध्ये पहिल्यांदा रक्षाताईंनी निवडणूक लढवली, तेव्हा त्यांना ६ लाख ५ हजार मते पडली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनीष जैन होते आणि त्यांनी २ लाख ८७ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. यावेळी रक्षाताईंचे मताधिक्य ३ लाख १८ हजारांच्या आसपास होते. यापूर्वी २००९ मध्ये हरिभाऊ जावळे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवताना ३ लाख २८ हजार मते मिळवली होती. यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी ३ लाखांच्या आसपास मते मिळवली होती. बसपाचे सुरेश पाटील यांनी ३३ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. हरिभाऊंनी २८ हजारांच्या फरकाने दिल्ली गाठली होती. यावेळी भाजपचे मताधिक्य फार मजबूत नव्हते. नंतरच्या दोन निवडणुकीमध्ये खडसे घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने मताधिक्य तीन लाखांच्या पुढे गेले होते. २०२४ ला मात्र मताधिक्य कमी झाले आणि ते पावणे तीन लाखांच्या घरात आले. २००९ पूर्वी रावेरऐवजी एरंडोल मतदारसंघ होता. त्या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचे बऱ्यापैकी वर्चस्व होते. १९७७ ला आणीबाणीविरोधातील वातावरणाने जनता पक्षाचे सोनुसिंग पाटील विजयी झाले होते. १९८०, ८४ मध्ये काँग्रेसचे विजयकुमार नवले पाटील दिल्लीत पोहोचले होते. १९८९ मध्ये भाजपचे उत्तमराव पाटील दिल्लीत गेले होते. १९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे विजयकुमार नवले पाटील विजयी झाले. त्यानंतर १९९६, ९९ आणि २००४ मध्ये तीन वेळा भाजपचे एम. के. पाटील विजयी झाले होते. २००७ च्या पोटनिवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मोरे विजयी झाले होते. १९७७ पासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर भारतीय जनता पक्षाने या  मतदारसंघावर चांगले वर्चस्व राखल्याचे दिसते. रावेर मतदारसंघ तयार झाल्यापासून म्हणजे २००९ पासून भाजपने सलग चार वेळा हा गड राखल्याचे दिसते. १९९८ मध्ये उल्हास पाटलांनी विजय मिळवल्यानंतर येथे काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. २०१९ मध्येही खडसे भाजपवर नाराज होते. मात्र, त्यांच्या सूनबाई रिंगणात असल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली नव्हती.

राजकीय बलाबल

रावेर मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर आणि बुलढाण्यातील मलकापूर अशा सहा मतदारसंघांचा समावेश आहे. चोपडामध्ये शिंदे सेनेच्या लताबाई सोनावणे, रावेरमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी, भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे, जामनेरमध्ये भाजपचे गिरीश महाजन, मुक्ताईनगरमध्ये अपक्ष चंद्रकांत पाटील आणि मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकांडे असे आमदार आहेत. रावेर आणि मलकापूरमधील काँग्रेस आमदारांच्या मदतीच्या जोरावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक लढवावी लागली. त्यातच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा कल शिंदे सेनेकडे झुकणारा असला तरी त्यांची भूमिका तशी संदिग्ध होती. 

खडसेंची पलटी

खरे बघायला गेले तर राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तसा तगडा उमेदवार नव्हता. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत असतील या राजकीय गणितातून शरद पवार यांनी हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात मागून घेतला होता. मात्र, त्यानंतर खडसे यांनीच  भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची झाली. खडसेंची ताकद आणि दोन काँग्रेस आमदारांच्या ताकदीच्या जोरावर हा मतदारसंघ लढवण्याचा शरद पवारांचा मनसुबा असावा. गेल्या २५ वर्षांमध्ये भाजपचे रावेरमध्ये वर्चस्व असल्याचे दिसते. खडसे आपल्या बाजूला नसतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या बालेकिल्ल्यात चांगली लढत दिली. भावजय आमने-सामने येण्याची शक्यता मावळली.

एकाच कुटुंबात दोन पक्ष

जिल्ह्यातील राजकारणातही गेल्या चार वर्षांत भूकंप झाल्याचे दिसते. शिवसेनेतील फुटीचा राजकारणावर परिणाम झाला. सर्वाधिक चर्चा झाली ती खडसेंच्या निर्णयाने. २०१९ पूर्वी एकनाथ खडसे यांनीच खर तर जिल्ह्यात भाजपची पाळे-मुळे मजबूत केली. पक्षाचा पाया विस्तारला. २०१९ मध्ये विधानसभेला  खडसेंनाच डावलले, खडसेंच्या कन्या रोहिणी आपल्या बालेकिल्ल्यातच पराभूत झाल्या. पराभवाने आणि पक्षात डावलले जात असल्याने खडसेंची नाराजी वाढली. त्यातच त्यांच्यावरील आरोप आणि चौकशीमुळे त्यांची कटुता वाढत गेली. अखेर एकनाथ खडसेंनी भाजप सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही ते शरद पवारांसोबतच राहिले. सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपबरोबरच राहिल्या. एवढेच नव्हे तर खडसे भाजपमध्ये गेले असले तरी त्यांची वकील कन्या रोहिणी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यामुळं एकाच कुटुंबातील सदस्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असल्याचे चित्र आहे. 

रावेरमधील आपली मांड पक्की करताना आपल्याला आव्हान देऊ शकतील असे काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पक्षात आणल्याने भाजपचा विजय तसा निश्चित होता. डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या केतकी पाटील हिच्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र, हे आव्हान भाजपने सुरुवातीलाच मोडून काढले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच असलेल्या रोहिणी खडसेंच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा होती. खडसेंनी निवडणूक लढवावी असा शरद पवारांचा आग्रह होता. खडसेंनी सुरुवातीला उत्साहही दाखवला होता. भाजप रक्षा खडसेंऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या शक्यतेने खडसे उत्साही होते. भाजपनं रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर करत खडसेंचा उत्साह मोडून काढला. त्यामुळे खडसेंनी आजारपणाचं कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले. तसेच कन्या रोहिणीही निवडणुकीत उतरणार नसल्याचं सांगितले. त्यामुळे बारामतीप्रमाणे नणंद- भावजय आमने-सामने येण्याची शक्यता मावळली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest