पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी; भाजपाची यादी जाहीर, हे आहेत उमेदवार

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 1 Jul 2024
  • 03:47 pm
Political News, Pankja Munde, Yogesh Tilekar, Sadabhau Khot

संग्रहित छायाचित्र

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा  समावेश आहे. महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपानं पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.  पुण्यातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे. या आधी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेवर करण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मुंडे यांचे पुनर्वसन कधी होणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, आता मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आगामी काळातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २ जुलै आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest