जळगाव लोकसभा मतदारसंघ: भाजपचा वट कायम!

गेली ३५ वर्षे जळगाववर एकहाती वर्चस्व ठेवलेल्या भाजपला ठाकरे शिवसेनेने यावेळी कडवी लढत दिली. नेहमी मोठे मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपच्या मतपेढीत घुसखोरी करत आपण विजयाच्या जवळ पोहोचू शकतो, हा संदेश देण्यात ठाकरे यशस्वी झाले आहेत.

Jalgaon Lok Sabha Constituency

संग्रहित छायाचित्र

गेली ३५ वर्षे जळगाववर एकहाती वर्चस्व ठेवलेल्या भाजपला ठाकरे शिवसेनेने यावेळी कडवी लढत दिली. नेहमी मोठे मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपच्या मतपेढीत घुसखोरी करत आपण विजयाच्या जवळ पोहोचू शकतो, हा संदेश देण्यात ठाकरे यशस्वी झाले आहेत. कधीकाळी युतीत मित्र असलेल्या ठाकरेंनी जळगाव जिल्ह्यात आपली वेगळी वाट निवडल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

जळगाववर गेल्या ३५ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व असून यातील मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा भाजप उमेदवारांनी दिल्ली गाठली आहे. त्यापूर्वी जळगाववर काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे हरी पाटसकर, शिवराम राणे, एस.एस.सय्यद, कृष्णराव पाटील, यादव महाजन आदींनी काँग्रेसचे दिल्लीत प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसच्या या वर्चस्वाला भाजपच्या गुणवंतराव सरोदे यांनी सर्वप्रथम सुरुंग लावला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए. टी. पाटील यांनी ही प्रथा कायम ठेवत भाजपचा बोलबाला कायम ठेवला. २०१९ मध्ये उन्मेष पाटील यांनी भाजपची विजयाची पताका कायम ठेवली.  कधीकाळी जिल्ह्यात शिवसेनेचं बळ वाढताना दिसत होते. मात्र त्याकाळी युती असल्याने शिवसेनेने येथे कधी उमेदवार दिला नाही. यावेळी मात्र शिवसेनेने ही संधी साधली आणि पक्षसंघटनेचा पाया मजबूत करण्याचे काम केले. 

राजकीय इतिहास 

जळगाववरील काँग्रेसचे वर्चस्व संपवले ते भाजपच्या गुणवंतराव सरोदे यांनी. ते १९९१ ते १९९६ या काळात खासदार होते. त्या अगोदर १९९८ मध्ये काँग्रेसचे उल्हास पाटील दिल्लीत गेले होते. त्यापूर्वी १९५२ ते १९७१ या काळात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व मतदारसंघावर होते. १९५७ मध्ये नौशेर भरुचा हे अपक्ष उमेदवार दिल्लीत पोहोचले होते. १९७७ ला जनता पक्षाचे यशवंतराव बोराळे निवडून आले होते. १९८१, ८४ आणि ८९ मध्ये काँग्रेसचे यादव शिवराम महाजन निवडून आले होते. १९९८ ला काँग्रेसचे उल्हास पाटील आणि त्यानंतर १९९९ ते २००४ भाजपचे वाय. जी. महाजन, २००७ ला भाजपचेच हरिभाऊ जावळे, २००९, २०१४ ला भाजपचे ए.टी.पाटील निवडून आले होते.

काय झाले?

२०२४ ला भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्याने उन्मेष पाटलांचा गट नाराज होता. भाजपच्या स्मिता वाघ यांना ६ लाख ७४ हजार तर ठाकरे सेनेचे करण पाटील पवार यांनी ४ लाख २२ हजार मते  मिळवली. स्मिताताई २ लाख ५१ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या. २०१९ ला भाजपला ४ लाख ११ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्याचा विचार करता एवढे मोठे अंतर ठाकरे सेनेने कापण्याचा केलेला प्रयत्न लक्षणीय आहे. यावेळी भाजपचे मताधिक्य अडीच लाखांच्या आसपास आणणे हे ठाकरे सेनेचे यश म्हणावे लागेल. उन्मेष पाटलांची उमेदवारी कापण्यापूर्वी ठाकरेंनी येथून हर्षल माने यांची उमेदवारी निश्चित केली होती. भाजपने स्मिताताईंची उमेदवारी जाहीर केल्यावर ठाकरे यांनी उन्मेष यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार केला होता. चर्चेअंती अखेर करण पाटील पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. २०१९ मध्ये भाजपकडून लढलेले उन्मेष पाटील यांना ७ लाख ३१ हजार तर राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना ३ लाख २ हजारांच्या आसपास मते पडली होती. २०१९ मध्ये उन्मेष पाटलांसाठी स्मिता वाघ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्या निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या.

भाजपने २०१९ मध्ये ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून उन्मेष यांच्या रूपानं नवीन उमेदवार दिला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर मैदानात होते. त्यावेळी उन्मेष पाटील चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्ये भाजपचे ए.टी.पाटील यांना ६ लाख ४७ हजार तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना २ लाख ६४ हजार (मताधिक्य ३ लाख ८३ हजार) मते मिळाली होती. २००९ मध्ये भाजपचे ए.टी.पाटील यांना ३ लाख ४३ हजार, तर राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांना २ लाख ४७ हजार मते (मताधिक्य ९६ हजार) मिळाली होती. 

सेनेचे वाढते बळ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती बासनात गुंडाळली गेल्याने भाजप-शिवसेना वेगळे लढले. त्यावेळी सहापैकी तीन आमदार निवडून आणत शिवसेनेनं शक्ती दाखवून दिली. शिवसेनेतील फुटीनंतर गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि किशोर पाटील सेनेचे आमदार शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार भाजपबरोबर गेल्याने त्यांचे बळही भाजपच्या मदतीला आले. अशा विपरीत स्थितीतही ठाकरे गटानंही पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंनी पक्ष मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फलीत म्हणून ठाकरे सेनेला सव्वा चार लाखांच्या आसपास मते  मिळाली. 

खडसे, महाजनांचा प्रभाव 

जळगावचा निकाल राजकीय समीकरणे आणि नेत्यांच्या प्रभावावर ठरतो. मंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव, त्यांचे काम आणि भाजपच्या संघटनेच्या आधारे स्मिताताई यांनी दिल्ली गाठली. महाजन यांच्याप्रमाणे एकनाथ खडसे यांचेही जिल्ह्यावर वर्चस्व आहे. मात्र, ते यावेळी तेवढे सक्रिय असल्याचे दिसत नव्हते. खडसे मनाने भाजपमध्ये आणि शरीराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी शरद पवार गटाने आपल्याकडे उमेदवार नसल्याची भूमिका घेतली, यातच सगळे काही आले. खुद्द खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश अजून जाहीर झालेला नाही. राज्यातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील मतभेद दीर्घकाळापासून दिसत आहेत. खडसे यांना कायदेशीर लढाईत गुंतवल्यावर त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादीचा हात धरला होता. फडवीस यांचे पक्षातील विरोधक आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या शिष्टाईस यश येऊन खडसे मनाने भाजपमध्ये आले आहेत. अजूनही ते समारंभपूर्वक पक्षप्रवेश व्हावा याची प्रतीक्षा करत आहेत. दुसरीकडं शिंदे गट भाजपबरोबर असला तरी त्यांच्यातही काही प्रमाणात नाराजी होती. विधानसभेला भाजप शिंदे सेनेच्या विरोधात उमेदवार देत असल्याचा राग नेत्यांच्या मनात पाहायला मिळतो.

राजकीय बलाबल 

जळगाव मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून जळगाव शहरमध्ये सुरेश भोले, चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण हे भाजपचे तर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील, एरंडोलमध्ये चिमणराव पाटील, पाचोरामध्ये किशोर आप्पा पाटील हे तिघे शिंदे सेनेचे तर अंमळनेरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील असे आमदार आहेत. एकंदरीत राजकीय स्थिती पाहता ठाकरे सेनेला कोणाकडूनही मदत मिळण्याची चिन्हे नव्हती. मतदारांचा शिवसेनेवरील विश्वास आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा याच्या जोरावर करण पाटील पवार या नवख्या उमेदवाराला मैदानात लढावे लागले.
Jalgaon Lok Sabha Constituency

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest