टिळेकर, गोरखेंना विधान परिषदेवर संधी!
लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने मोठे कमबॅक करत बाजी मारली. यातच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपतर्फे योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांच्या उमेदवारीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. (Yogesh Tilekar)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघांच्या ४ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. जुलैमध्ये आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ११ नावांची चर्चा सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना संधी मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे.
योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे या नेत्यांच्या नावाचा भाजपच्या विधान परिषदेच्या यादीत समावेश आहे. या यादीत पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ या दोन महिला नेत्यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने १० नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. ४०० पार घोषणेचा अर्थ संविधान बदलणार असा काढण्यात आला. दलित मतांची विभागणी झाल्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले
अमित गोरखे यांच्या रुपाने दलित चेहरा देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून उमा खापरे यांच्यानंतर गोरखे हे दुसरे विधान परिषद आमदार असणार आहेत. तर पुण्यातून ओबीसी चेहरा म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर यांची वर्णी लागली आहे.
पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांनाही संधी?
काही चर्चांनुसार, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, जालन्यातील पराभूत उमेदवार रावसाहेब दानवे आणि परभणीतील पराभूत उमेदवार महादेव जानकर यांच्या नावाची विधान परिषदेच्या जागांसाठी चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधान परिषदेत संधी देऊन काही समीकरणे जुळवण्याचे काम भाजपकडून केले जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकजा मुंडेंचा लवकरच विधिमंडळात सदस्य म्हणून समावेश केला जाऊ शकतो. सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधळण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील ११ आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर, ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच निकाला जाहीर होणार आहे.
भाजपकडून या नेत्यांची चर्चा
पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, नीलय नाईक, माधवी नाईक