अजित पवार यांना महायुतीतून काढा !

अजित पवार महायुतीत काही काळानंतर उशिरा यायला हवे होते, असे धक्कादायक विधान करून शिंदे शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीमधील बेबनाव समोर आणला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 28 Jun 2024
  • 06:18 pm
Ajit Pawar

अजित पवार यांना महायुतीतून काढा !

विधानसभेत सत्ता आणायची असेल तर अजित पवार नको ; भाजपा चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांची मागणी

अजित पवार महायुतीत काही काळानंतर उशिरा यायला हवे होते, असे धक्कादायक विधान करून शिंदे शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीमधील बेबनाव समोर आणला. त्यानंतर आता अजित पवार यांचा महायुतीतील सहभाग भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही खटकायला लागला आहे.

भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ज्या भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी अक्षरश: चिरडले, त्याच अजित पवारांना आमच्या बोकांडी बसवलेय, अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत अजित पवार असतील तर असली सत्ता आपल्याला नको, अशा टोकाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाने भाजपचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जाते. अजित पवार जर सत्तेत असतील तर भाजप वाढायला मर्यादा येतील, अशीही त्यांच्या मनात भावना असते. अशाच प्रकारच्या संतप्त भावना भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केल्या.

पुण्याचे पालकमंत्री बनवून त्यांना आमच्या बोकांडी बसवले आहे. त्यांनी आदेश द्यायचे आणि आम्ही ते फॉलो करायचे, अशी आमची अस्वस्था आहे. अनेक वर्षे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोध केला आहे. त्याच राष्ट्रवादीला कशासाठी भाजपसोबत घेतले आहे , असा सवाल करणारे भाजपचे कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहेत. तुम्ही पुढील निर्णय लवकरात लवकर घेऊन अजितदादांना महायुतीबाहेर काढा, असे सुदर्शन चौधरी म्हणाले. अजितदादा सोबत असतील तर विधानसभेची सत्ता नको अशी खदखद भाजप पदाधिकाऱ्यानं बोलून दाखवली.

भाजपच्या बूथलेव्हलपासून जिल्हा पातळीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अजित पवार नकोत. आम्ही काय अजितदादांसाठी सत्ता आणायची का? पालकमंत्री होऊन त्यांनी बॉस व्हायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या  कार्यकर्त्यांना भरडण्याचे काम होणार असेल तर अशी सत्ता आम्हाला नको. आमच्या लोकांना आमदार होऊ द्या, त्यांनी पक्ष वाढवला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

ते दोघे मंत्री झाले असते पण…

अजित पवार यांनी राहुल कुल, योगेश टिळेकर यांच्यावर अन्याय केला. नाहीतर आता हे दोघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे अजित पवार यांच्याकडे निधी मागायला गेले तर तुमचा काय संबंध, १० टक्के निधी देऊ, असे ते म्हणतात. अरे असली सत्ता आपल्याला कशाला हवी, अशा उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अजितदादांसाठी सत्ता आणायची का?

कार्यकर्त्यांचे मन काय सांगते हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आमच्या अनेक लोकांना महामंडळ भेटले असते, मंत्री झाले असते. अजित पवार जर आमच्यासोबत राहणार असतील तर अशी सत्ताच आम्हा भाजप कार्यकर्त्यांना नको. पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याची सारखीच परिस्थिती आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही. लोकांचे हाल झाले आहेत. गेले दहा-दहा वर्षे, आम्ही त्यांच्याशी दोन हात करत आहोत. आता त्यांच्यासोबतच हात मिळवणे यात काय अर्थ आहे?

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest