पडद्याआडून! भाजपचा गड...!

देशाच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभवाचा धक्का देणारा मतदारसंघ अशी ओ‌ळख असलेल्या उत्तर मुंबईने पाचवेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या राम नाईक यांनाही पराभवाचा धक्का दिलेला आहे.

BJP

संग्रहित छायाचित्र

देशाच्या पहिल्या  निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभवाचा धक्का देणारा मतदारसंघ अशी ओ‌ळख असलेल्या उत्तर मुंबईने पाचवेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या राम नाईक यांनाही पराभवाचा धक्का दिलेला आहे. नाईक यांच्याविरोधात अभिनेता गोविंदाला निवडून देणाऱ्या या मतदारसंघाने उर्मिला मातोंडकरला नाकारले आहे. १९८९ नंतर अपवाद वगळता नेहमी साथ देणारा हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा गड म्हणावा लागेल.  

उत्तर मुंबई हा भाजपचा गड असल्याचे मानले जाते. आणीबाणी पूर्वी काँग्रेसला साथ देणाऱ्या या मतदारसंघाने १९७७ पासून आपला रंग बदलला. १९८९ पासून तर भारतीय जनता पक्षाने आपला या मतदारसंघावर प्रभाव असल्याचे सिद्ध केले आहे. २००४ आणि २००९ चा अपवाद केला तर १९८९ पासून या मतदारसंघाने भाजपला साथ दिली आहे.  

राजकीय बलाबल 

उत्तर मुंबई मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. एका ठिकाणी शिवसेना-शिंदे गटाचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे. बोरिवलीत सुनील राणे, दहिसरमध्ये मनिषा चौधरी, कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर, चारकोपमध्ये योगेश सागर हे भारतीय जनता पक्षाचे चार , मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे अस्लम शेख आणि मागाठाणेमध्ये शिंदे सेनेचे प्रकाश सुर्वे असे राजकीय बलाबल आहे. एकूणच भाजपची विधानसभा मतदारसंघांमध्येही ताकद असल्याने हा भाजपचा गड असल्याचे मानले जाते. गोयल यांच्या नावापूर्वी अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे यांच्या नावाचीही  भाजपमध्ये चर्चा  होती. अखेर पियुष गोयल यांनी बाजी मारली.

काँग्रेसचा नवखा उमेदवार 

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसकडून सुरुवातीला संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा होती. उर्मिला मातोंडकरने निवडणूक लढविण्यात फारसा रस दाखवला नाही. संजय निरुपम यांचे व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाच्या रचनेत बसणारे नव्हते. आपला विचार होत नसल्याचे पाहून त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरूवात केली आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेने निरुपम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा हात धरला. हा मतदारसंघ जागावाटपात भाजपला जाणार हे निश्चित असतानाही त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. संजय निरुपम हे मुळचे शिवसेनेतील. शिवसेनेच्या हिंदी मुखपत्राचे ते काही काळ संपादकही होते. अखेर त्यांची चाल फसून त्यांना भाजपच्या प्रचारात सहभागी व्हावे लागले. 

काँग्रेसकडे या मतदारसंघात तसा प्रबळ उमेदवार नव्हता. अखेर त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषषविणारे भूषण पाटील यांना उमेदवारी दिली. भूषण पाटील तसे नवखे उमेदवार असूनही केवळ काँग्रेसच्या आमदार अस्लम शेख यांच्या मदतीच्या जोरावर भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला आणि केंद्रीय मंत्र्यांच्या ताकदीला लढत देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे चार आणि शिंदे सेनेचा एक अशा पाच आमदारांची ताकद पियुष गोयल यांच्या मदतीला असताना त्यांचा विजय तसा साहजिकच म्हणावा लागेल. मात्र, तेही या मतदारसंघात तसे नवखे होते. 

सुरक्षित मतदारसंघ 

पियुष गोयल पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आतापर्यंत ते कायम राज्यसभेचे खासदार राहीले आहेत. त्यांचे वडिल वेदप्रकाश गोयल पक्षाचे दीर्घकाळ खजिनदार होते तर मातोश्री चंद्रकांता गोयल भाजपकडून आमदार होत्या. उत्तर मुंबई हा भाजपसाठी नेहमी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे पियुष गोयल यांच्यासाठी ही निवडणूक फारशी कठीण नव्हती. बोरीवली, कांदीवली भागात संघाचे चांगले जाळे आहे. त्यातच गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघात चांगला संपर्क ठेवल्याचा गोयल यांना फायदा झाला. २००४ मध्ये मध्ये जनता दलाच्या विद्या चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे मते विभागली गेली होती. त्यामुळे अभिनेता गोविंदाला विजयी होता आले होते. २००९ मध्येही मनसेच्या उमेदवारीमुळे मतविभाजन होऊन काँग्रेस नेते संजय निरुपम विजयी झाले होते. हा लोकसभा मतदारसंघ जात, धर्म आणि आर्थिक रचनेचा विचार केला तर मिश्र वस्ती असलेला आहे. त्यातच उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.  मुंबईत असलेल्या वाहतूक, झोपडपट्ट्या आणि जुन्या चाळींचा प्रश्न येथेही आहेच. संरक्षण खात्याच्या जागेचा प्रश्न येथे आहे. 

राजकीय इतिहास 

देशाच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभवास सामोरे जावे लागलेला मतदारसंघ अशी नोंद असलेल्या या मतदारसंघात २०१९ पर्यंत अत्यंत चुरशीच्या निवडणुका झालेल्या आहेत.खरे बघायला गेले तर राम नाईक आणि गोपाळ शेट्टी यांच्या कामामुळे उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो. १९५२ मध्ये उत्तर मुंबई द्विसदस्यीय मतदारसंघ होता. एकाच मतदारसंघातून सर्वसाधरण आणि राखीव असे दोघेजण निवडून येत. १९५२ ला काँग्रेसकडून व्ही. बी. गांधी (सर्वसाधारण) आणि नारायण कारजोळकर (राखीव) हे निवडून आले होते. यावेळी सोशालिस्ट आणि शेड्युल कास्ट फेडरेशनकडून अशोक मेहता (सर्वसाधारण) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (राखीव) हे रिंगणात होते. एवढेच नव्हे तर कॉ. श्रीपाद डांगेही मैदानात उतरले होते. पुढील निवडणुकीत म्हणजे १९५७ मध्ये हा मतदारसंघ एक सदस्यीय झाला आणि काँग्रेसचे व्ही. के. कृष्ण मेनन विजयी झाले. त्यानंतर १९६२ लाही तेच विजयी झाले आणि ते संरक्षणमंत्री झाले. मात्र, चीन युद्धानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणीबाणीनंतर जनता पार्टीकडून १९७७ मध्ये मृणाल गोरे आणि १९८० मध्ये रवींद्र वर्मा विजयी झाले. १९८४ मध्ये काँग्रेसकडून अनूपचंद शाह खासदार बनले. 

२०२४ मध्ये  पियुष गोयल यांच्यासमोर तसा तगडा उमेदवार नसल्याने अपेक्षेप्रमाणे ते विजयी झाले आणि त्यांनी पक्षाचे वर्चस्व कायम राखले. गोयल यांना ६ लाख ८० हजार तर काँग्रेसचे भूषण पाटील यांना ३ लाख २२ हजार मते मिळाली. गोयल यांचे  मताधिक्य ३ लाख ५७ हजार एवढे होते. २०१९ मध्ये गोपाळ शेट्टी यांना दणदणीत ७ लाख ६ हजार मते पडली होती. काँग्रेसच्या उर्मिला मांतोडकर यांना २ लाख ४१ हजारांच्या आसपास मते पडली. शेट्टी यांचे मताधिक्य ४ लाख ६५ एवढे दणदणीत होते. २०१४ मध्येही गोपाळ शेट्टी विजयी झाले होते तेव्हा त्यांचे मताधिक्य ४ लाख ४६ हजारांच्या आसपास होते. त्यावेळी शेट्टी यांना ६ लाख ६४ हजार तर काँग्रेसचे संजय  निरुपम यांना २ लाख १७ हजार मते पडली होती. या अगोदर २००९ मध्ये संजय निरुपम विजयी झाले होते तेव्हा त्यांना ३ लाख ५५ हजार मते पडली होती तर भाजपचे राम नाईक यांना २ लाख ४९ हजार मते पडली होती. मनसेचे शिरीष पारकर यांनी १ लाख ४७ हजार मते घेतली होती. या मतविभाजनामुळे नाईक यांना पुन्हा एकदा पराभवास सामोरे जावे लागले. २००४ मध्ये राम नाईक यांचा पहिल्यांदा पराभव झाला तेव्हा त्यांच्यासमोर काँग्रेसकडून अभिनेता गोविंदा मैदानात होता. गोविंदाला ५ लाख ५९ हजार, राम नाईक यांना ५ लाख ११ हजार तर अपक्ष उमेदवार विद्या चव्हाण यांना १४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. राम नाईक यांना ४८ हजारांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. पाचवेळा निवडून आलेल्या राम नाईकांचा हा पहिला पराभव.   

चित्र तारे-तारका 

या मतदारसंघातून दोनदा चित्रपट अभिनेत्यांनी आपले नशिब अजमावले आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार काँग्रेसकडून निवडणूक मैदानात उतरले होते.  त्यातील अभिनेता गोविंदा यांने २००४ मध्ये राम नाईक यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला पराभूत करत एक इतिहास निर्माण केला होता. त्यापूर्वी पाचवेळा राम नाईक या मतादारसंघातून विजयी झाले होते. २०१९ मध्येही काँग्रेसने भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात चित्रतारकेला मैदानात उतरवले होते. चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने  प्रथमच निवडणूक लढवली. पुलवामा आणि त्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर उर्मिलाचा राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.  १९८९ ला भाजपचे राम नाईक खासदार झाले. १९९१, १९९६, १९९८, १९९९ मध्येही तेच खासदार झाले. पाचवेळा खासदार झालेल्या राम नाईक यांचा २००४ मध्ये काँग्रेसचा उमेदवार अभिनेता गोविंदा याने पराभव केला. त्यानंतर २००९ मध्ये गोविंदाने निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे काँग्रेसनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पुन्हा राम नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेत भाजपचे गोपाळ शेट्टी संसदेत पोहोचले. ही निवडणूक मात्र रंजक आणि रंगतदार बनली, ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या उमेदवारीने. उर्मिलाने आपले राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र, तिचा मोदी लाटेत गोपाळ शेट्टींनी पराभव केला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest