जगदीश मुळीक
“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. परंतु घोषणा झाल्यानंतर भाजपचा उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा असते, भाजपमध्ये जर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ५-६ उमेदवार असतील, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागावी, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, पक्षाकडून जो निर्णय येईल त्याचे आम्ही स्वागत करू, पक्षाने आदेश दिला तर मी देखील पोटनिवडणूक लढवण्यास तयार आहे”, असे वक्तव्य भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुण्यातील नाले व ड्रेनेज यांची साफसफाई व्हावी, यासाठी जगदीश मुळीक यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. पुण्यातील साफसफाई साठीचे निवेदन देखील यावेळी त्यांनी आयुक्तांना दिले आहे. निवेदन दिल्यानंतर जगदीश मुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. जर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागली तर ही जागा काँग्रेसने लढवायची की राष्ट्रवादीने लढवायची, यावर दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झालेला आहे.”
“पूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण काँग्रेसकडे होता. मात्र बारामती, शिरूर, मावळ आणि आता उरले-सुरले पुणे मतदारसंघ देखील राष्ट्रवादी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेससाठी आता पुण्यामध्ये एकही मतदारसंघ ठेवण्यात नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोण लढवणार यासाठी अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हा सुरू झालेला वाद निवडणुका लागल्यानंतर देखील असाच पाहायला मिळणार आहे”, असेही जगदीश मुळीक म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.