शरद पवार यांचा नवा गेम प्लान; अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या घरवापसीला हिरवा कंदील

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने (शरद पवार) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही लोक संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

Sharad Pawar

संग्रहित छायाचित्र

अनेक जण संपर्कात असल्याचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने (शरद पवार) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही लोक संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यावर शरद पवार यांनी बुधवारी (दि. २६) मौन सोडत बंडखोर आमदारांच्या घरवापसीला हिरवा कंदील दाखवला. शरद पवार यांच्या या नव्या गेम प्लानमुळे राज्याचे राजकारण येत्या काळात ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

शरद पवार म्हणाले, ‘‘जे नेते पक्ष आणि जनतेसाठी मदत करतील, पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील आणि अशा लोकांच्या परतण्याचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र, ज्या लोकांनी पक्षात राहून पक्षाचे फायदे घेतले, फायदा घेतल्यानंतरही पक्षाचे नुकसान करण्यासाठी पावले उचलली, त्या लोकांबाबत आता सध्या पक्षात जे नेते आहेत, त्यांचे मत घ्यावे लागेल.’’

शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रात अजित पवार गटात खळबळ माजली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खुलासा करताना सांगितले की, ‘‘शरद पवार योचे हे विधान जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे आमदार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. कोणी कुठेही जाण्याची शक्यता नाही.’’

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. त्यांना फक्त एकच जागा निवडून आणता आली. भाजपसोबत गेल्याने काहीच फायदा झाला नाही. अजित पवार मूळ राष्ट्रवादीतून आमदार घेऊन भाजपसोबत गेले खरे पण त्यांना व्होटबँक काही नेता आली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार नाकारत असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीच्या आमदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे.

अजित पवारांसोबत गेलेले काही आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ज्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होणार आहे त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही. दहा वर्षांपूर्वी पक्ष सोडून भाजपात गेलेल्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा राष्ट्रवादीत परतल्या. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

पक्षाचं नुकसान करून गेलेल्यांची घरवापसी नाही...

ज्यांनी पक्षाचा फायदा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला. पक्षाचं नुकसान करून गेलेल्या आमदारांना आता पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही. परंतु, ज्यांच्यामुळे पक्षाचा फायदा होईल अशांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल. आमदारांच्या या घरवापसीचा निर्णय पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून घेतला जाईल यासाठी कार्यकर्त्यांचंही मत विचारात घेतलं जाईल असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आलं आहे. पक्षात पुन्हा येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटात पक्षाला फायदा देणारे आणि दुसऱ्या गटात पक्षाचं नुकसान करून भाजपात गेलेल्या नेत्यांचा समावेश आहे. या दुसऱ्या गटातील नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने भाजपसोबत गेल्याचं सांगितलं जात आहे. या गटात अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या नेत्यांचा समावेश होतो. आता त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच आमदारांना पक्षात घेतलं जाऊ शकतं. शरद पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest