रणसंग्राम २०२४: राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास शिवाजीराव आढळराव तयार

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव यांची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Shirur Lok Sabha Constituency

संग्रहित छायाचित्र

‘अभिनेता नको, नेता खासदार हवा’ अशा आढळराव समर्थकांच्या घोषणा, विरोधकांना उमेदवार आयात करावा लागतो - अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव यांची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) कडून लढण्याची आपली तयारी असल्याचे संकेत आढळराव यांनी दिले आहेत. दरम्यान, आपल्या विरोधात मजबूत उमेदवार मिळत नाही हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kokhe) यांनी म्हटले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना 'खासदार म्हणून निवडूनच कसा येतो ते बघतो' असे आव्हान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यात आता म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून लोकसभा लढविणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, जुन्या शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत आम्हाला ‘अभिनेता नको तर नेता खासदार हवा’ अशा घोषणा देत निवडणूक लढविण्याची विनंती पाटील यांना केली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची राजकारणापलीकडे मैत्री आहे. त्यांनी एकत्रित येत भीमाशंकर सहकारी कारखान्याची स्थापना केली होती. एकमेकांचे मित्र असले तरी राजकीय भूमिका मात्र वेगळी होती. एकमेकांविरोधात निवडणुका लढविल्या होत्या. आता भाजपा, शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्ताने आढळराव पाटील आणि वळसे पाटील एकत्र आले आहेत. शिंदे गटाकडून आढळराव इच्छुक असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांना  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करावा लागेल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून मंचरच्या जाहीर सभेच्या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनी आढळराव पाटील यांच्यासह वळसे पाटील यांच्यावर कठोर टीका केली होती.

आपल्या उमेदवारीच्या दाव्याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, म्हाडाचे अध्यक्षपद स्वीकारले म्हणून लोकसभा निवडणूक लढविणारच नाही असे होत नाही. मी महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढविणारच आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. हा मतदारसंघ ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षात प्रवेश करून लोकसभा लढविणार आणि जिंकणारच.

विरोधी उमेदवार ठरत नाही हीच कामाची पावती -कोल्हे 

शुक्रवारी पुणे मार्केट यार्ड निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी मॅरेथॉन बैठका घेत आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  अमोल कोल्हे म्हणाले, " शिरूर लोकसभेत विजयासाठी आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आढावा बैठकीत शरद पवार यांनी सर्व पदाधिकारी यांना विजयासाठी जोमाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित होणार. महायुतीकडून २०० आमदार, २ उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असताना त्यांना उमेदवारी कोणाला द्यावी हे अंतिम होत नाही. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे असे मी मानतो. त्यामुळे अगोदर उमेदवारी निश्चित होऊ द्या, पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल असे व्हायला नको. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीवरून आदेश आल्यावर माना हलविणारे नंदीबैल निवडून द्यायचे की स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारी निवडणूक आहे. आढळराव पाटील यांच्या भूमिकेबाबत मी काही बोलणार नाही. हा त्यांचा निर्णय आहे. परंतु मायबाप जनताच त्यांचे मूल्यमापन करेल. महाविकास आघाडीमध्ये संभ्रम नाही, महायुतीत आहे. त्यामुळे जनतेसमोर कौल मागायला आम्ही जाणार आहोत."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest