पुणे: महाविकास आघाडीचे तीन उमेदवार उद्या भरणार अर्ज; जाहीर सभेचे आयोजन

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)

संग्रहित छायाचित्र

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर हे उद्या (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरणार असून यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. १८ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी  कार्यालयात हे तिन्ही उमेदवार अर्ज भरणार असून त्यानंतर रास्ता पेठ येथील हॉटेल  शांताईसमोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत,  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके या सभेला उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. 

पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांची निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीमध्ये मविआच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार या नणंद भावजयींमध्ये थेट लढत होताना दिसणार आहे. शिरूरमध्ये मविआचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार असून मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी होणार असून महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे भिडणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest