मावळात एक वाघेरे बाद, एक संजोग ठरला पात्र!

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार विरोधकांनी उभे केले होते. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

Lok Sabha Election 2024

संग्रहित छायाचित्र

विकास शिंदे
मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील  (Sanjog Waghere Patil) यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार विरोधकांनी उभे केले होते. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांची डोकेदुखी थोडी कमी झाली आहे. एक वाघेरे बाद झाला पण संजोग पाटील यांचा अर्ज वैध ठरला.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकाने तर पाचव्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. २३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह सहा तर २४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २५ एप्रिल, शेवटच्या दिवशी २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे आणि उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव आणि आडनावाशी नामसाधर्म्य असलेल्या या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने वाघेरे यांची कोंडी झाली होती. त्यापैकी संजोग पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार बारणे यांचे समर्थक माउली घोगरे सोबत होते. त्यांच्या खिशावर धनुष्यबाणाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणे यांचे छायाचित्र होते. त्यामुळे बारणे यांनीच मतविभागणीसाठी ही खेळी खेळल्याचे दिसून आले. त्यापैकी संजय सुभाष वाघेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

मावळमध्ये ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, ३ उमेदवारांचे अवैध ठरले आहे. ५० नामनिर्देशन पत्रांपैकी ४६ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. एकूण ४  अवैध ठरली आहेत. कागपत्रांची पूर्तता न करणे तसेच, वेळेत अनामत रक्कम न भरणे या कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी हे अर्ज रद्द ठरवले.  संबंधित अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळवलेही होते. मात्र त्यांनी वेळेत ते दाखल न केल्याने अर्ज बाद करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रांची घोषणा केली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एम बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशनपत्रे दाखल करणारे उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

संजय सुभाष वाघेरे (अपक्ष) यांनी स्वतःचे नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत सादर केली नाही. राजेंद्र मानसिंह छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मिकी सेना, भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी संयुक्त आघाडी) यांनी अर्ज भरताना दिलेले शपथपत्र दोषपूर्ण आढळून आले. विजय विकास ठाकूर (अपक्ष) यांनी अर्ज भरल्यानंतर वेळेमध्ये अनामत रक्कम भरली नव्हती. या कारणांमुळे अर्ज बाद ठरवण्यात आले. दरम्यान, गोपाळ तंतरपाळे या उमेदवाराने दाखल केलेल्या ३ नामनिर्देशनपत्रांपैकी १ नामनिर्देशनपत्र पक्षाच्या वतीने भरले होते. त्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने ते नामनिर्देशनपत्र अस्वीकृत करण्यात आले. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest