कोणत्या तोंडाने मतं मागत आहात, मी असतो तर लाज वाटली असती; अजित दादांचा सुप्रिया सुळेंना सवाल

बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळावा घेतला.

संग्रहित छायाचित्र

बारामती लोकसभा मतदार संघाच्या (Baramati Lok Sabha)  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी ही गावकी-भावकीची निवडणूक नसून देशाची तसेच रोजी-रोटीची निवडणूक असल्याची आठवण मतदारांना करून दिली. या मेळाव्याला महायुतीमधील नेतेमंडळी देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधी उमेदवाराने एमआयडीसीच्या मुद्द्यावर भोर, वेल्हेकरांकडून मते मागितली. परंतु एमआयडीसीचं काम केलं नाही. तरीदेखील २०१९ ला हेच लोक पुन्हा मतं मागायला आले. मी असतो तर मला लाज वाटली असती.  तुम्ही कोणत्या तोंडाने मतं मागत आहात, असा सवाल अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना केला. तसेच त्यांनी नुसतं भाषण करण्याचं काम केलं असून, मी सकाळी ७ वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीन, पण नुसती भाषणं करून पोट भरणार आहेत का? अशा शब्दात अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.  भोर परिसरातील एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर लगेच प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. 

बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक कार्यपुस्तिका छापून प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा आहे. त्यावर टिका करताना अजित पवार म्हणाले, आताच्या खासदारांनी  कार्यपुस्तिका छापली आहे. त्यात मी केलेली कामे छापली असून, ही कामे त्यांनी स्वत: केल्याचे त्या सांगत आहेत. बारामतीची विकासकामे मी केली असून सुळे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यांसाठी कोणती कामे केली हे सांगावं असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही लोकांनी सुळे यांना १५ वर्ष निवडून दिले. पण तुम्हाला काहीच मिळाले नाही. पण आज मी तुम्हाला म्हणतो की,सुनेत्रा पवार यांना एकदा निवडून द्या, त्यांचं काम नक्कीच दिसून येईल, असे सांगत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवारांनी टिका केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest