Lok Sabha Election 2024: ८५ वर्षांवरील ज्येष्ठ , दिव्यांगांना टपाली मतदानाची मिळणार सुविधा

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Voting

संग्रहित छायाचित्र

मावळात २६३ ज्येष्ठ मतदार, ४५ दिव्यांग, तर शिरूरमध्ये ३९१ ज्येष्ठ मतदार, ८७ दिव्यांग मतदार, अत्यावश्यक सेवेतील १,६७५ मतदारांना टपाली मतदानाची सुविधा

विकास शिंदे
पुणे: लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मावळात २६३ ज्येष्ठ मतदार, ४५ दिव्यांग, तर शिरूरमध्ये ३९१ ज्येष्ठ मतदार, ८७ दिव्यांग मतदार आहेत. तसेच १ हजार ६७५ मतदारांनी या सुविधेसाठी अर्ज भरून दिले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मिळून ८५ वर्षांवरील १ हजार ३९७ आणि २६५ दिव्यांग मतदारांनी १२ डी अर्ज भरून दिला आहे. त्यांना घरून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील १३ मतदारांनी १२ डी नमुना भरून सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदानाची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टपाली मतदान करू इच्छिणाऱ्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी १२ डी भरून घेण्यात आले होते. तसेच अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील १२ डी अर्ज भरून दिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा देण्यात येणार आहे.

संबंधित मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन मतपत्रिकेवर मत नोंदवून घेण्यात येणार आहे. अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील १२ डी अर्ज भरून दिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या त्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या तारखांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदान करता येणार आहे. (Lok Sabha Election Voting)

सर्वाधिक अर्ज पुण्यात

पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६३ इतक्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरून दिले आहेत. या मतदारसंघात ४२ दिव्यांग मतदारांनी, बारामती लोकसभा मतदारसंघात २९० ज्येष्ठ मतदार तर ९१ दिव्यांग मतदारांनी १२ डी अर्ज भरून दिले आहेत. शिरूरमध्ये ३९१ ज्येष्ठ मतदार, ८७ दिव्यांग मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील १० मतदारांनी १२ डी अर्ज भरून दिले आहेत. मावळ मतदारसंघात ८५ वर्षांवरील २६३ ज्येष्ठ मतदार, ४५ दिव्यांग तर अत्यावश्यक सेवेतील ३ मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरून दिले आहेत, अशीही माहिती निवडणूक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकी वेळेस अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून विहीत मुदतीत नमुना १२  डी सादर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. टपाली मतदानाचा नमुना १२  डी चा अर्ज सादर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्र (पीव्हीसी) स्थापन करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी संबंधितांनी टपाली मतदान करावे. टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत राहतील. ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात १ ते ३ मे रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघ व ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात ७ ते ९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत टपाली मतदान केंद्रे कार्यरत राहतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest