‘घरातील आणखी लहान-सहान व्यक्तींना प्रचारात उतरवा’ - रेवती सुळेंच्या प्रचारातील सहभागावरून रुपाली चाकणकर यांचा टोला

खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. मात्र त्या संसदरत्न पुरस्कारातच रमल्या आहेत. त्यांनी जर सर्वसामान्य लोकांची कामे गेल्या पंधरा वर्षात केली असती तर त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब उतरवण्याची वेळ आली नसती,

Lok Sabha Election 2024

संग्रहित छायाचित्र

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. मात्र त्या संसदरत्न पुरस्कारातच रमल्या आहेत. त्यांनी जर सर्वसामान्य लोकांची कामे गेल्या पंधरा वर्षात केली असती तर त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब उतरवण्याची वेळ आली नसती, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर साधला. तसेच घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा, असाही टोला  चाकणकर यांनी सुळे यांना लगावला.

भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या. त्यावेळी चाकणकर यांना खासदार सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) त्यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) या देखील प्रचारात उतरल्या आहेत. असा प्रश्न विचारता चाकणकर यांनी सुळे यांच्यावर निशाणा साधला.

आजही निषेध करतो

चाकणकर म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी आणून केलेली कामे सांगून सुळे त्या कामांवर डल्ला मारत आहेत.  यावेळी चाकणकर यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. दरम्यान, महाविकास आघाडीत असताना महागाईच्या विरोधात आंदोलन करणार्‍या चाकणकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे गुणगान गायले. त्यावेळी त्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिलांसाठी राबविलेल्या योजनांचा पाढा वाचला. मणिपूरच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यावेळीही आम्ही निषेध केला आणि आजही निषेध करतो, असेही चाकणकर म्हणाल्या.

राज्य महिला आयोगात काम करताना मुली गप्प राहिल्याचे दिसून आले. दीड वर्षात कायद्याच्या अंमलबजावणीचे काम चांगले झाले आहे. माणसाची माणुसकी चार भिंतीत संपते. एखाद्या मुलीवर तिच्याच बापाकडून बलात्कार झाला तर मुलीचे भविष्य धोक्यात येते. नात्यांमधील दुरावा कमी होत असल्याने याचा विचार होणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या गेल्या आहेत. महिला कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य योजना, लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे समर्थन केले जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

सांगता येईना सिलिंडरची किंमत..

वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकघराचे आर्थिक बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरच्या दरात एक हजारांहून अधिक वाढ झाली आहे. सत्तेत आल्यास ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यावर चाकणकर यांना सिलिंडरची किंमत काय असावी, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दर कमी व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली, मात्र त्याची किंमत काय असावी हे  त्यांना सांगता आले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest