रोहन सुरवसे पाटील
केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मृगजळ दाखवत त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, इथला शेतकरी त्यांना या मातीत पाय ठेऊ देणार नाही, असा थेट निशाणा प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केसीआरवर साधला आहे.
सुरवसे पाटील म्हणाले की, बीआरएस पक्ष म्हणजे माध्यमांनी आणि जाहिरात बाजीचा फुगवलेला फुगा आहे. त्यातील हवा कधीही निघून जाईल. महाराष्ट्रातील मतांवर डोळा ठेवून, भाजप विरोधी मतांचे डीव्हीजन करण्यासाठी तेलंगणातील बीआरएस पक्ष महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या लोकांची भाजपसोबत आधीच डील झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना सुरवसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी ज्यादा कांदा दराचे आमिष बीआरएस वाल्यांनी दाखवले आहे. सुरुवातील त्यांनी रणनीतीचा भाग म्हणून शेतकऱ्याच्या कांद्याला ज्यादा भाव देखील दिला. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासोबत झालेल्या फसवणुकीने आणि आर्थिक नुकसानीमुळे मतांच्या राजकारणाचे आणि फसवेगिरीचे पितळ उघडे पडले आहे.
मुख्यमंत्री के.सी.आर यांनी महाराष्ट्रात लक्ष्य देण्यापेक्षा तेलंगणा राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी तिकडे प्रयत्न करावेत. खोटी आमिषे आणि पैश्यांचा भडिमार बंद करावा, यातच त्यांचे हित असल्याचा घणाघात प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केला आहे. त्याच्या गाडीचा ताफा पंढरपूर येथे अडवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.