संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्याला राजकीय पक्ष विरोध दर्शवणार आहेत. मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टपासून पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पुण्यातील अनेक कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून मणिपूर हिंसाचार होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष यांसह इतर विरोधी पक्ष मोदींच्या पुणे दौऱ्याचा निषेध करणार आहेत. १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.