संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा शंभरी पार करून देण्याची कामगिरी पार पाडणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असून त्यांच्या नावाची घोषणा ही केवळ औपचारिकता उरली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे या विजयामुळे मनमानी निर्णय घेऊ शकतो अशा स्थितीत भाजप पोहोचला आहे. मात्र सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा असणे चुकीचे नाही, मात्र वस्तुस्थिती मान्य करत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
देवाभाऊ गाण्यानेच झाले चित्र स्पष्ट
देवेंद्र फडणवीस यांनी केवळ निवडणुकीत चांगली कामगिरी केली नाही, तर एका चांगल्या मुलाप्रमाणे आणि शिस्तप्रिय सैनिकाप्रमाणे ते भाजप नेतृत्वाच्या आदेशावर आंधळेपणाने काम करत आहेत. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे सर्वात मोठे दावेदार ठरतात. महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच मिळणार आहे. निवडणुकीदरम्यान देवाभाऊंच्या नावाने मराठीत गाणे बनवण्यात आलेला ४ मिनिटांचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा’ असे बोल होते. या गाण्यात २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर २०२२ पासून आतापर्यंत महाराष्ट्र सरकारचे कामकाज व्हीडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे पहिली ५ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. 'देवा देवा देवा भाऊ' या गाण्यासोबत बनवलेल्या व्हीडीओमध्ये देवेंद्र फडणवीस कोस्टल रोड ते अटल सेतू, समृद्धी एक्स्प्रेस हायवे, मुंबईतील मेट्रोचे विस्तारणारे जाळे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बोगदे अशी विकासकामे दाखवण्यात आली आहेत.
सोमवारी शपथविधीची शक्यता
सोमवारी ( दि. २५) महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी राजभवनवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील, अशी माहिती समोर येत आहे. शपथविधीबाबत आज रविवारी (दि. २४) रात्री उशिरा दिल्लीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. सोमवारी शपथविधी होणार हे निश्चित आहे. तुर्तात तिघांचा शपथविधी होणार आहे. अन्य कोणालाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार नाही. नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर कोणाला किती मंत्रीपद मिळणार हे निश्चित केले जाणार आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने त्यांचा सत्तेला वाटा हा पन्नास टक्के असणार आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या वाट्याला कमी मंत्रीपदे येण्याची दाट शक्यता आहे.
शिंदे केंद्रात जाण्याची शक्यता
मोदी-शाह अनेकदा सरप्राईज प्लॅन्स देतात हे संपूर्ण देशाला माहिती आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या वर्षीच हे दिसून आले आहे. निवडणुकीपूर्वीच हरियाणात आश्चर्याचा धक्का बसला होता. पराभूत झालेले असतानाही पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्याचवेळी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी एकाला केंद्रातून ऑफर दिली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे केंद्रात जाऊ शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दमदार मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यासारखा दमदार प्रशासक असणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रात स्थान देण्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश होता.