बारामती अजित पवारांचीच; शरद पवारांवर मात करत केला युगेंद्र पवारांचा पराभव

संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या व शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवारांचा पराभव केला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पक्षाचे उमेदवार निवडून आणत मिळवले नेत्रदीपक यश

संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या व शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवारांचा पराभव केला आहे. या विजयाने अजित पवारांनी बारामतीचा गड तर राखला आहेच याशिवाय त्यांच्या पक्षाला मिळालेल्या जागांच्या जोरावर आपण राज्याचे नेते असल्याचेही काका शरद पवारांना दाखवून दिले आहे.  

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्येही बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होती. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यामध्ये युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशिनची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपला विजय कायम ठेवला आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्येदेखील अजित पवार यांना आपला विजय कायम ठेवण्यास यश आले आहे. बारामतीमध्ये निकालाच्या पूर्वीच अजित पवारांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते. आता अजित पवार यांनी बारामतीचा गड राखत आपला विजय निश्चित केला आहे.

अजित पवारांनी सिद्ध केले नेतृत्व
बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. पक्षांतर व पक्षफुटीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची बनली होती. बारामतीच्या निकालाकडे फक्त राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी गावागावांमध्ये जाऊन तळागळातील मतदारांची भेट घेतली होती, तर नातवाच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता. अगदी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची शेवटची सभा बारामतीत घेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली होती. गुंडगिरी, मलिदा गॅंगचे आरोप करत अजित पवारांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या सर्वांवर मात करत अजित पवारांनी बारामती राखली आहे. याखेरीज अजित पवारांनी आपल्यासोबत आलेल्या बहुतांश आमदारांना पुन्हा निवडून आणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आपणच उत्तम सांभाळू शकतो, हे दाखवून दिले आहे.

महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केले. त्यांनी हे ट्विट करताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे. या फोटोसोबत त्यांनी तीन ओळींचे खास कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलंय. या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, अजित पवार यांनी प्रचारासाठी खास रणनीती आखली होती. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांच्या प्रचारयात्रेत गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापर करण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी प्रचारमोहिमेसाठी गुलाबी रंगाचा वापर केला होता. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असे ट्विट केले आहे.

बारामती हेच दादांचे कुटुंब- सुनेत्रा पवार
ज्या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्रा चे नव्हे तर देशाचे लक्ष लागले होते,  त्या बारामती मतदारसंघात अजित पवारांचा मोठा विजय झाला आहे. या विजयानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरेतर मी बारामतीच्या जनतेचे आभार मानते. त्यांनी नेहमीप्रमाणे दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहेत. बारामतीकरांनी दाखवून दिले की बारामती हे दादांचे कुटुंब आहे. रात्रंदिवस अजित पवारांनी बारामतीच्या विकासाचाच ध्यास बाळगलेला आहे. त्यांच्या या ध्यासाला, अथक परिश्रमाला बारामतीकर जनतेने नेहमीच साथ दिली आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा
या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील प्रभावाचा वचपा काढला आहे. इंदापूरातील हर्षवर्धन पाटील, शिरूरमधील अशोक पवार, भोर मतदारसंघातील संग्राम थोपटे, दौंडमध्ये रमेश थोरात यांचा पराभव केला. शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार गटाच्या दत्ता भरणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर दौंडमध्ये  राहूल कुल यांनी शरद पवार गटाच्या थोरात यांना आस्मान दाखवले. संग्राम थोपटे यांचा अजित पवार गटाच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला.     

थेट शरद पवारांच्या विरोधातील लढाई जिंकली
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री व महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी मविआचे उमेदवार व पुतणे युगेंद्र पवार यांच्यावर मोठ्या फरकाने मात केली. अजित पवार यांनी बारामती जिंकल्याने थेट शरद पवार यांच्या विरोधातील लढाई त्यांनी जिंकल्याची चर्चा आहे. बारामती विधानसभेची निवडणूक यंदा प्रथमच प्रचंड गाजली. यापूर्वी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. त्यामुळे दुखावले गेलेल्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र बऱ्याच चुका सुधारल्या. काका शरद पवारांवर टीका करणे टाळत महायुती सरकारने काय कामे केली, कोणत्या विकासयोजना राबवल्या, हे सांगण्यावर भर दिला.  गेल्या सात विधानसभा निवडणुका तसे पाहिले गेले तर अजित पवार यांनी एकतर्फीच जिंकल्या आहेत. परंतु यंदा पक्ष फुटीनंतर अजित पवार यांना घरातूनच कडवे आव्हान उभे राहिले होते. युगेंद्र पवार यांच्या रूपाने सख्या पुतण्यानेच त्यांना आव्हान दिल्याने अजित पवार यांनाही पहिल्यांदाच आमदारकीला प्रचंड घाम गाळावा लागला. अर्थात त्यातून त्यांचा विजय सुकर झाला. लोकसभेला पत्नी सुनेत्रा पवार यांना  सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर अजित पवार कमालीचे सावध झाले. बारामतीतून सुळे यांना ४८ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने अजित पवार यांची चिंता वाढली होती. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या पराभवानंतर लागलीच कामाला सुरुवात केली. पक्ष बांधणी नव्याने सुरू केली. ज्या पदाधिकाऱ्यांविषयी तक्रारी होत्या, त्यांना विधानसभेवेळी दूर ठेवत सगळी सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. त्याचा परिणाम त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला.

झंझावातापुढे शरद पवार समर्थक हतबल
दुसरीकडे शरद पवार यांनी युगेंद्र याच्या रूपाने अजित पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. युगेंद्र यांच्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, रेवती सुळे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. परंतु अजित पवार यांच्या झंझावातापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अजित पवार यांचे बारामती तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे, त्याचा फायदा त्यांना  झाला. लोकसभेवेळी तालुक्यात वाद निर्माण करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हाताच्या अंतरावर ठेवल्याने त्याचा फायदा अजित पवार यांना झाला. लोकसभेला ताई व विधानसभेला दादा अशी बारामतीतील जनता बोलत होती. तेच निकालातून दिसून आले. अजित पवार यांच्या विकासकामांना बारामतीकरांनी साथ दिल्याचे दिसून आले. लोकसभेला ताईला भरभरून मते देणाऱ्या बारामतीकरांनी अजित पवार यांना मते देताना कोणतीही कुचराई केली नाही. त्यातूनच त्यांचा विजय सुकर झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest