संग्रहित छायाचित्र
मुंबई : अजित पवार आणि रोहित पवार हे एकच आहेत. दोघांनी एकत्रित एकमेकांना पूरक भूमिका घेतल्या आहेत. अजित पवारांनी जाणूनबुजून माझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही. रोहित पवार यांना मदत व्हावी म्हणून अजित पवार यांनी सभा घेणे टाळले, असा आरोप भाजपचे कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे. अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली. पण अजित पवार यांनी मुद्दाम सभा घेतली नाही. रोहित पवार यांचे मतदान असणाऱ्या बारामतीत केंद्रावर अजित पवारांना मतदान त्यांच्या परिवाराने केले आहे. रोहित पवारांनी अजित पवार हे एकत्र आहेत, असा दावाही राम शिंदे यांनी केला आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो, असे सोमवारी प्रा. राम शिंदे म्हणाले आहेत. माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झाले असते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पराभवानंतर राम शिंदे म्हणाले, त्यांच्या (पवार कुटुंब) राजकीय सारीपाटात माझा बळी गेला. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मते मिळाली आहेत. तर, राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा अवघ्या १२४३ मतांनी पराभव केला. दरम्यान आज अजित पवार-रोहित पवार यांची भेट झाली. त्यावेळी थोडक्यात वाचलास. माझी एखादी सभा झाली असती तर काय झाले असते? असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. यावरून आता राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी राम शिंदे यांचे डोळेही पाणावले होते.
राम शिंदे म्हणाले, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेढा येथे एक वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता. माझ्या विरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आला.
थोडक्यात वाचलास...
प्रीतिसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार व अजित पवार यांची आज सकाळी भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना नमस्कार केला. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना मिश्किलपणे कानपिचक्या दिल्या. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांनी त्यांचं दर्शन घ्यायला लावले. बेटा काकाचे 'दर्शन' घे... थोडक्यात बचावलास. जर मी या ठिकाणी सभा घेतली असती तर काय झाले असते, असे म्हणूत अजित पवार यांनी रोहित यांना पाया पडायला लावले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र राम शिंदे यांचे आरोप फेटाळले. राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. तसे असेल तर सुनील टिंगरे यांना वाटते की तिथे काहींनी काम केले नाही. पण मला वाटते महायुतीला जे यश मिळाले आहे, ते सर्वांनी मेहनत घेतली त्यातून मिळाले आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.