संग्रहित छायाचित्र
राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळ विधानसभेत सुनील शेळके यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेत सर्वपक्षीय अपक्ष उमेदवाराचा १,०८,५६५ मतांनी पराभव केला. आमदार सुनील शेळके हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत, तर सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना ८२ हजार ६९० मते मिळाली आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके व सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात चुरशीची लढत सुरू झाली होती. भाजपचे मावळ तालुक्यातील नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे मावळ तालुका विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, बाळासाहेब घोटकुले, सायली बोत्रे, जितेंद्र बोत्रे व अन्य काही पदाधिकारी यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत महायुतीमधून फारकत घेत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती.
मावळ तालुक्यामधील सर्वपक्षीय नेते यांना एकत्र करत या निवडणुकीमध्ये सुनील शेळके यांच्याविरुद्ध मावळ पॅटर्न तयार करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे, भाजप पदाधिकारी, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी नेते यांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मावळ तालुक्यामधील बहुतांश सर्वच नेते हे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात गेल्याने सुनील शेळके विरुद्ध मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी अशी ही निवडणूक झाली होती. महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी उमेदवार न देता अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मावळ तालुक्यातील सर्व नेते माझ्या विरोधात गेले असले तरी मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता व माझ्या माता भगिनी या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या असल्याचे आमदार सुनील शेळके या प्रचारादरम्यान वारंवार सांगत होते. अखेर हाच जनाधार आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी राहिल्याचे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दिसून आले.
प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके हे मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांवर बोलत होते आणि पुढील काळामध्ये काय कामे करणार आहे याबाबत सांगत असताना विरोधी पक्षाने मात्र केवळ सुनील शेळके यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टीका सुरू ठेवली होती. नूतन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग तळेगाव दाभाडे या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर बॅलेट मशिन मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. २९ फेऱ्या मतमोजणीच्या झाल्या. याकरता १४ टेबल लावण्यात आले होते. अगदी पोस्टल मतमोजणी पासून तर शेवटच्या २९ व्या फेरीपर्यंत आमदार सुनील शेळके यांनी प्रत्येक फेरी मधली आघाडी कायम ठेवली. ३२९१ मताने सुरू झालेली त्यांची आघाडी ही २९ व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ५६५ मतांवर गेली.
७० हजारांच्या पुढे मताधिक्य गेल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी मतमोजणीच्या ठिकाणी येऊन माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मला मिळालेले हे यश माझे नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या मायमाउलींचे यश आहे. ज्यांनी दिवस-रात्र एक करत तालुक्यात घरोघरी जाऊन माझा प्रचार केला त्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ या सर्वांचे हे यश आहे. जोपर्यंत माझी नीतिमत्ता व माझी नियत चांगली आहे तोपर्यंत माझी जनता माझ्यासोबत आहे, हा माझा विश्वास आज मावळच्या जनतेने खरा करून दाखवला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत राहतात परंतु जे झाले ते झाले. यापुढील काळामध्ये मावळ तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणत विकास कामे करण्याचा येथील पर्यटन विकासाला चालना देण्याचा येथील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचा व मावळ तालुक्याला सर्वांगीणदृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन मावळ तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा त्याच जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निकालानंतर संपूर्ण मावळ तालुक्यात गावोगावी आणि शहरांमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या विजयाचा जल्लोष त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी साजरा केला.