संग्रहित छायाचित्र
दौंडला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी सलग तिसऱ्यांदा विजय होऊन हॅट् ट्रिक साधली आहे तर, महाविकास आघाडी पराभूत उमेदवार रमेश थोरात यांची पराजयाची हॅट् ट्रिक झाली आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल यांनी ७४६ मतांनी निसटता विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी १३ हजार ८८९ मतांनी बाजी मारली. कुल यांना १,२०,७२१ मते मिळाली. १,०६,८३२ मते घेणाऱ्या रमेश थोरात यांना यावेळीही पराभवाचे तोंड बघावे लागले.
लाडकी बहीण आणि आरोग्यदूत म्हणून केलेली कामे राहुल कुल यांना विजयासाठी जमेच्या बाजू ठरल्या. पाटस येथील सुरू झालेल्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या संदर्भात राहुल कुल यांच्यावर टीका होत होती, मात्र या टीकेवर मात करीत कुल यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. कारण विरोधकांनी भीमा पाटस कारखान्याला लक्ष केले होते. मात्र कुल त्यांना पुरुन उरले.
राहुल कुल यांना पहिल्याच टप्प्यात भाजपची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना तालुक्यात मतदारांशी संपर्क साधने सोपे झाले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना मात्र प्रचार यंत्रणेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह नेहमीप्रमाणे स्वतःचा आत्मविश्वास नडला. तुतारी चिन्ह मिळवण्याच्या धावपळीत थोरात यांचा जनसंपर्क कमी झाला होता. मात्र ऐनवेळेस तुतारी चिन्ह रमेश थोरात यांना दिल्या गेल्यामुळे पवारांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांसह काही प्रमाणात जनतेत नाराजी होती. ही नाराजी मतपेटीतून दिसून आली. भीमा पाटस कारखान्याची वाताहत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गुणगान यासह अन्य काही थोरातांचे मुद्दे या निवडणुकीत होते मात्र या मुद्द्यांचा फारसा फायदा निवडणुकीत झाला नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळावा...
दौंड तालुक्याला लाल दिवा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून दौंडकरांची इच्छा आहे, वरवंड येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले होते की, ‘‘तुम्ही मला आमदार द्या. मी तुम्हाला मंत्रीपद देतो.’’ येथील जनतेने फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहुल कुल यांना आमदार केले. आता देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देऊन शब्द पाळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.