संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच महायुतीची पुन्हा विजयाच्या दिशेने घोडदौड होत असतानाच या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीकडे जातील का, हे पहावे लागणार आहे. ते कोथरूडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकात पाटील यांना उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीच्या सोबत आल्यास तुमची काय भूमिका असेल? असे विचारण्यात आले असता त्यावर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. काही अपक्षांची साथही मिळणार आहे. अशा परिस्थितीत महायुतीकडून उद्धवजींना आमंत्रण दिले जाण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करतील, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय दिल्लीतून
मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे केंद्रीय बोर्ड याबाबत निर्णय घेतील. तो जे ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. भाजपचे केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल, ते आम्हाला मान्य आहे, असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, कारण त्यांना लांबचे दिसते.
... तर आता चांगला निकाल लागला असता
चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ मध्ये लोकांनी भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या निर्णयामुळे अनेकांना वाईट वाटले. आम्हालाही व्यक्तिश: वाईट वाटलं होते त्यावेळी तसे काही झाले नसते तर आता यापेक्षाही चांगला निकाल शिवसेना-भाजपच्या बाजूने लागला असता. आज हे निकाल पाहण्याची आवश्यकता नसती.
राऊतांवर साधला निशाणा
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. लोक आता त्यांचे सकाळचे प्रवचन ऐकणार नाहीत. जो वेळेत आपली एक्झिट करतो, तोच शहाणा माणूस असतो. त्यांनी आता लिखाणावर लक्ष केंद्रित करावे. पण त्यांनी रोज टीव्ही समोर येऊन बोलू नये, कारण लोक त्यांना पाहिल्याबरोबर टीव्ही बंद करतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.