चंद्रकांत पाटील, हे वागणं बरं नव्हं!

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुलींना १ जूनपासून उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत मिळेल, असे जाहीर केले होते. त्या घोषणेवरून त्यांनी सवंग प्रसिद्धी मिळवली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 26 Jun 2024
  • 01:38 pm
Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील, हे वागणं बरं नव्हं!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा हवेतच? शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही मुलींच्या मोफत शिक्षण घोषणेची अंमलबजावणीच नाही!

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुलींना १ जूनपासून उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत मिळेल, असे जाहीर केले होते. त्या घोषणेवरून त्यांनी सवंग प्रसिद्धी मिळवली, आता शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शिक्षण संस्थांनी विद्यार्थिनींना शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे, मात्र मोफत उच्च शिक्षण ही केवळ घोषणाच ठरल्याने राज्यातील विद्यार्थिनींना चंद्रकांत पाटलांनी फसवले, अशी टीका राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली. दरम्यान, पाटील असे फसवणे बरे नव्हे, मुलींना मोफत उच्च शिक्षण कधी? असा सवाल देखील कामगार  आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

आकुर्डीतील थरमॅक्स चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) ,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चंद्रकांत पाटलांना आज कष्टकरी कामगारांनी मोफत शिक्षणासंबंधी सवाल केला. यावेळी सरचिटणीस तुषार घाटुळे, सिद्धनाथ देशमुख, ओमप्रकाश मोरया, नाना कसबे, युवराज नीलवर्ण, अनिल माने, राधा वाघमारे, वंदना  कदम आदी उपस्थित होते.

 नखाते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी, २०२४ यांनी  महाराष्ट्रातील मुलींना अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण आणि वैद्यकीय अशा अनेक अभ्यासक्रमांसाठी जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. कोणतेही शुल्क मुलींना भरावे लागणार नाही. यासाठी मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त असू नये. त्यापुढील जे शिक्षण मुली घेणार आहेत ते मोफत दिले जाणार असल्याचे पाटील म्हणाले होते. आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी या घोषणेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच नाही. शहरातील विविध महाविद्यालयांच्या भरमसाठ फी मुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून देतात, तर काही दुय्यम दर्जाचे शिक्षण घेतात अशी स्थिती आहे. काही विद्यार्थी तर शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे राज्यातील एका जबाबदार मंत्र्यांनी मोफत उच्च शिक्षण देणार असल्याची घोषणा केली. मात्र ती घोषणा निवडणुकीसाठी केली होती का? आता त्या घोषणचे काय झाले असा सवाल नागरिक, कामगार आणि पालक उपस्थित करू लागले आहेत.  त्यांच्या घोषणेवरून पालकांची फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest