अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी संबंधित वृद्धेची थेट मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घालून दिली
साहेब आम्हाला राहायला घर नाही... औषधोपचाराला तीन लाख घेऊन आम्ही आमचे घर दिले... आता त्या लोकांना पैसे द्यायला नसल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत, अशी कैफियत एका वृद्धेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पैसे काढून दिले आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांना सूचना करीत या महिलेचे घरदेखील परत मिळवून दिले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) झाले. कार्यक्रम झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी संबंधित वृद्धेची थेट मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घालून दिली. तिची व्यथा ऐकताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने तीन लाख रुपये तर दिलेच, शिवाय या महिलेचा प्रश्न मार्गी लावा, अशी सूचना पिंपरी-चिंचवड पोलिसांना केली. आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे प्रकरण महिला पोलीस निरीक्षकाकडे सोपविले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत निगडी पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबांना बोलावून घेत त्यांच्यात तडजोड करून वृद्ध दाम्पत्याला घर परत मिळवून दिले.
पतीच्या आजारपणासाठी पैसे नसल्याने निगडी ओटा स्कीममधील घर विकता येत नसतानाही संबंधित महिलेने ते नोटराईज पद्धतीने करारनामा करून एका कुटुंबाला देऊन त्यांच्याकडून २०१६ मध्ये ३ लाख ३५ हजार रुपये घेतले होते.
दोन मुले आणि दोन मुली असतानाही ते आई-वडिलांला सांभाळत नसल्याने ही वेळ त्या महिलेवर आली होती. ७८ वर्षीय पतीचे उपचार करून त्याला बरे केल्यावर ही ७२ वर्षीय पत्नी २०१६ पासून मोलमजुरी करून दोघांचे पोट भरत होती. मात्र, वयोमानामुळे आता मोलमजुरी करणेदेखील दोघांना शक्य होत नाही. त्यातच राहायला छपर नसल्याने त्या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
मुख्यमंत्र्यांनी सगळी कैफियत ऐकून घेतल्यावर गाडीमधून ३ लाख काढून हे पैसे पोलिसांकडे देत हा विषय काय आहे त्याची चौकशी करून या माउलीला तिचे घर परत मिळवून देण्याच्या सूचना केल्या. थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तेजस्विनी कदम यांना घटनास्थळी बोलावून त्या वृद्ध महिलेला आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.
नंतर संबंधित महिलेचे घर विकत घेणाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा या कुटुंबाने आम्ही घर घेण्याच्या बदल्यात पैसे दिले होते. पारदर्शक पद्धतीने लेखी स्वरूपात हा व्यवहार झाल्याचे कागदपत्र त्या कुटुंबाने पोलिसांना दाखवले. त्याचबरोबर आमचे पैसे परत मिळाल्यास घर परत देण्याचे लेखी आश्वासन पोलिसांना दिले. घरातील सामान हलविण्यासाठी दोन दिवसांची मुदत त्या कुटुंबाला देण्यात आली. दोन्ही कुटुंबांचे समाधान झाल्यावर दोघांकडून तसे लिहून घेण्यात आले. घर रिकामे होईपर्यंत दोन दिवसांसाठी त्या वृद्ध दाम्पत्याच्या राहण्याची व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले पैसे तहसीलदारांकडे देण्यात आले असून, दोन दिवसांनी दोन्ही कुटुंबाला परत निगडी पोलीस ठाण्यात बोलावून घर दिल्यावर तहसीलदार यांच्याकडे ठेवण्यात आलेले पैसे, २०१६ मध्ये घर घेणाऱ्यांना दिले जाणार आहेत. दुपारी दोन वाजता सुरू झालेला हा सगळा प्रकार रात्री पावणेआठ वाजेपर्यंत निगडी पोलीस ठाण्यात सुरू होता. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या स्वतः हे सगळे प्रकरण मिटेपर्यंत निगडी पोलीस ठाण्यात बसून होत्या.
पोटच्या पोराबाळांनी आम्हाला रस्त्यावर सोडले. अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण या प्रकरणावर तोडगा निघत नव्हता. आम्हाला पैसे कोण देणार, हा प्रश्न होता. काय करायचं, हे समजत नव्हते. पण सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना भेटल्यास तुमचा प्रश्न मार्गी लागेल, असे आम्हाला काही लोकांनी सांगितले. मुख्यमंत्री शहरात आल्याचे समजल्याने मी त्यांना भेटायला गेले. पण मला त्यांना भेटायचं कसं, हे समजत नव्हते. आमच्या वेळेची अभिनेत्री वर्षा उसगावकर एकदम समोर आली आणि मी तिला सगळा प्रकार सांगितला. तिने माझी भेट मुख्यमंत्र्यांशी घालून दिली आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी मला पैसे दिले.
- मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडणारी महिला
अडल्यानडल्या जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, हे बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्यच आहे. पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात भेटलेली महिला माझ्या आईसमान होती. तिचं गाऱ्हाणं ऐकल्यानंतर ‘करतो... बघतो...’ अशा आश्वासनावर बोळवण करणं, मला शक्यच नव्हतं. त्यामुळं मी त्यांना मदत केली. त्या आईला पुन्हा घराचा ताबा मिळेल याची काळजी घ्या, असे निर्देश संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्वसामान्य जनतेला मदतीसाठी हक्काने माझ्याकडे यावे, असे वाटते आणि मला त्यांचे दुःख हलके करण्याचे सौभाग्य लाभते, यासारखा दुसरा आनंद नाही.
- एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री
मी निमित्तमात्र : वर्षा उसगावकर
नाट्य संमेलनात मी प्रेक्षकांमध्ये बसले होते तेव्हा ती महिला स्टेजच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होती. सुरक्षेच्या कारणास्तव तिला थांबविण्यात आले. ती कोणाचे ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे मी तिच्याशी बोलले. तिची व्यथा ऐकून मी तिला मुख्यमंत्र्यांकडे नेले. मुख्यमंत्र्यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतल्यावर क्षणाचाही विलंब न करता स्वतःकडील पैसे दिले. तत्काळ त्या महिलेचा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना देऊन ते निघूनदेखील गेले. असे मुख्यमंत्री मी यापूर्वी कधी पाहिले नाहीत. निगडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तेजस्विनी कदम आणि तहसीलदार अर्चना निकम यांनी सहा तास दोन्ही बाजू ऐकून घेत त्या महिलेचा प्रश्न मार्गी लावला. सदर महिलेला घर मिळवून देण्यात मी केवळ निमित्तमात्र ठरले. निगडी पोलीस ठाणे, तहसीलदारांची टीम आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी ‘सीविक मिरर’कडे व्यक्त केली.