रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर सर्वांनीच आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते जमले होते. यावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते. रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेले वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडत आहे, ते बघितल्यावर मतदारांचे असे म्हणणे आहे की राजकारण खूप गलिच्छ पातळीवर गेले आहे. आमच्यासारखे नवे आमदार राजकारणात येत असताना एक ध्येय घेऊन आलेत विचार घेऊन आलेले आहेत.”
“आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात देऊन कुठेतरी चूक केली का? कारण लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक स्वतःबद्दल स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वतःचे जे काही उद्दिष्ट असेल ते कसे पूर्ण करता येईल, याच्यामध्ये गुंतून राहिलेले आहेत”, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांना रविवारच्या आमदारांच्या बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, “आमदारांच्या बैठकीचा निरोप हा पाच तारखेचा आम्हा सर्वांना आलेला आहे. आम्ही पाच तारखेला मुंबईला राष्ट्रवादीची जी बैठक पवार साहेबांनी बोलवलेली आहे, तिथे नक्कीच आहोत. हे जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता. पण भाजप नक्कीच पक्षाला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. शिवसेना ज्या पद्धतीने तोडली, तसा प्रयत्न राष्ट्रवादीमध्ये पण होईल असा एक अंदाज होता.”
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेते म्हणल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव पहिले घेतले जाते. लोकांनी चालू केलेली पार्टी म्हणजेच शिवसेना आणि शरद पवारांनी सुरू केलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष असे आहेत. की जे भाजपला एक हाती सत्ता आणण्यापासून रोखू शकतात. यामुळे या दोन पक्षांना फोडल्यास कुठेतरी भाजपाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आणता येईल असे वाटते. त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडले तर शेवट आपण एकटेच राहू असे भाजपला वाटते. मात्र भाजप हे विसरले आहे की आपल्याला निवडून देणारे लोक असतात. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात होणार नाही कारण मतदार हे होऊ देणार नाही.”
“अजित पवार हे माझे काका आहेत. अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधी कधी राजकारण बाजूला ठेवले तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. शेवटी हा राजकारणाचा एक भाग आहे. आदरणीय पवार साहेबांचा मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच काम केलेला आहे. ते जे काही दिशा देतील, त्या दिशेने आम्ही सर्वजण नक्कीच नक्कीच जाऊ”, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.