कर्नाटकात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणार?
#बंगळुरू
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी राज्यात पक्षाला १४१ जागी विजय मिळेल आणि स्वबळावर पक्ष सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेतीळ संभाव्य उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनंतर शिवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत हा दावा केला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोलार मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले आहे. या यादीत कोलारसाठी त्यांच्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात २२४ विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला ११३ पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. आगामी निवडणुका त्यांच्यासाठी 'मेक ऑर ब्रेक' आहेत का असे विचारले असता, शिवकुमार यांनी मी तोडणार नाही, मी बनवणार आहे. १४१ जागांवरील विजयासह मी राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्पष्ट बहुमत मिळणार असल्याने धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत (जेडीएस) हातमिळवणीची शक्यताही त्यांनी फेटाळली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होणार असून निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहेत. शिवकुमार कनकापुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिद्धरामय्या अनेक दिवसांपासून कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत होते. पक्षाने त्यांना वरुणा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.वृत्तसंस्था