संग्रहित छायाचित्र
नाशिक: नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या बाहेरच प्रसारमाध्यम व पोलिसांसमोर कांदे व भुजबळ भिडल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेनंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
समीर भुजबळ म्हणाले, मी रस्त्याने जात होतो. तिथे मला काही बस, टेम्पो, ट्रक उभे असलेले दिसले. मी ते पाहण्यासाठी आत गेलो. तिथे स्थानिक आमदाराची शाळा आहे. तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आले होते. ते सगळे पाहून मी पोलिसांना फोन केला. निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केली. मी त्यांना सांगितले की तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आले आहे. पैसे वाटण्याचे काम चालू होते, लोकांना जेवण दिले जात होते. खानावळी चालू होत्या, हे सगळे पोलिसांना कळायला हवे होते. मात्र, त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. तेवढ्यात आमदार महाशय तिथे आले आणि ते थेट माझ्या अंगावर धावून आले. मला जीवे मारण्याची धमकी देत होते, त्यांनी मला शिवीगाळही केली. पोलीस मात्र हे सगळे निमूटपणे बघत बसले होते. त्यांच्याबरोबर (आमदार) आलेले गुंड जे तडीपार आहेत ते मला मारायचा प्रयत्न करत होते. मी त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. परंतु, पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही.
आज तुझा मर्डर फिक्स
तडीपार गुंड मनमाडमध्ये, नाशिकमध्ये शस्त्र घेऊन फिरत आहेत. लोकांना धमक्या देत आहेत. आज ते पोलिसांसमोरच आले होते. मी पोलिसांना म्हटले की, यांना अटक करा. परंतु, त्यांनी अटक केली नाही. पोलिसांनी त्यांना इथून पळून जायला सांगितले. पोलीसच गुन्हेगारांना पळवून लावत होते. आमदाराच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली, मला मारायची धमकी दिली आणि पोलीस मात्र हे सगळे बघत बसले होते. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. शिवीगाळ होत आहे. आज पत्रकारांसमोर मला शिवीगाळ केली. मला मारण्याची धमकी दिली. ‘आज तुझा मर्डर होणार’, ‘तुझा मर्डर फिक्स आहे’, असे शब्द आमदाराने वापरले. ‘मी तुझा मर्डर करणार’ असे बोलून ते मला धमक्या देत होते. पोलीस मात्र निमुटपणे बघत होते