संग्रहित छायाचित्र
अंतरवाली सराटी: नवे सरकार स्थापन झाल्यावर मी नव्याने निर्णायक लढा उभारणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर शेवटच्या मोठ्या उपोषणाची वेळ जाहीर करणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच मी मैदानात असतो तर कोणाचे सरकार सत्तेवर येणार हे ठरवू शकलो असतो, असेही पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. राज्यात सध्या कुणाचे सरकार राज्यात येणार? याबाबत तर्क लावले जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे. आम्ही मैदानात नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता. राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. आता निवडणूक विषय संपलेला आहे. मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून टाकला आहे आणि आता आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान राज्यामध्ये मागील दीड वर्षांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन, उपोषण व मोर्चा यामधून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली.
मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. यामुळे राज्याचे राजकारण जोरदार रंगले होते. जरांगे पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका देखील केल्या होत्या. तसेच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ व जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाल्याचे देखील दिसून आले. मात्र आचारसंहिता लागेपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऐनवेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेपासून माघार घेत कोणताही उमेदवार उभा केला नाही. तसेच कोणाला पाडा असे स्पष्ट नाव घेऊन सांगितले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे विधानसभेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असा अंदाज असताना त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही.
राज्याच्या वतीने आपण सामूहिक उपोषण लावले आहे, त्याची सर्वजणांनी तयारी करावी. उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की, घोषित करणार आहोत. गावात कुठेही आमरण उपोषण करायचे नाही, आमरण उपोषण अंतरवाली सराटीत करायचे आहे. आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केलं आहे. त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे आहे, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.