मुंबई : अरबी समुद्रात मासेमारी करणारी काळभैरव नावाच्या मासेमारी नौकेतील ७ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने पकडले. त्यांना पकडून पाकिस्तानी समुद्री हद्दीमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू असताना भारतीय तटरक्षक दलाला ही बातमी समजताच तब्बल दोन तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रिम नावाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाज पीएमएस नुसरत जहाजाला अडवून त्यातील भारतीय मच्छिमारांची सुटका केली.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार संरक्षण अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी तटरक्षक दलाला स्पष्ट इशारा दिला की, कोणत्याही अटीशिवाय ते पाकिस्तानी जहाजामध्ये भारतीय मच्छिमारांना पळवून नेण्याची परवानगी देणार नाही. भारतीय मच्छिमारांना वाचवण्यासाठी आयसीजीएस अग्रिम जहाज दोन तासांहून अधिक काळ प्रयत्न करत होते.
अनेकदा भारतीय कैद्यांच्या बदल्यात भारताने पकडलेल्या आतंकवाद्यांची मागणी पाकिस्तानकडून केली जाते. अनेकदा चुकून भारतीय मच्छिमार समुद्री सीमा लक्षात न आल्याने पाकिस्तानी समुद्री हद्दीमध्ये प्रवेश करतात. पाकिस्तानचे मच्छिमारदेखील अनेकदा भारतीय हद्दीत येतात. भारताने मागील वर्षी अशा अनेक पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका केली. या प्रमाणेच पाकिस्ताननेदेखील मच्छिमारांची सुटका केली होती. परंतु असे असले तरी अनेक भारतीय मच्छिमार आजही पाकिस्तानच्या तुरुंगात अत्यंत दयनिय आयुष्य कंठत आपल्या सुटकेची वाट पाहात आहेत.
पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत होती आणि तटरक्षक दलाने पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग करून त्यांना रोखलं आणि मच्छिमारांची सुटका केली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवार (दि. १७ नोव्हेंबर) रोजी भारतीय तटरक्षकाच्या जहाजाला भारतीय मच्छिमारांच्या बोटीचा कॉल आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास पकडल्याची माहिती संदेशात देण्यात आली. ही माहिती मिळताच तटरक्षक दलाने त्या भागाकडे धाव घेत पाकिस्तानी जहाजाला रोखून भारतीय मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक जहाज ॲडव्हान्सने मच्छिमारांना वाचवण्यासाठी दोन तास पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग केला.