संग्रहित छायाचित्र
सोलापूर : सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला असल्याचा आरोपही कोळी यांनी केला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेल्या फलकाला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले आहे.
शिंदे पिता–पुत्रीने अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मतदानानंतर बिघाडी झाली असल्याचे चित्र सोलापूरमध्ये आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केलेला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ही माणसे धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या पदरात पडला. मात्र युतीमध्ये असलेल्या खासदार प्रणिती शिंदे व जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ऐनवेळेला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. शिंदे परिवाराने मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. कादाडी हे शांत व संयमी व्यक्तीमत्त्व असल्याचे म्हणत प्रणिती शिंदे यांनी काडादी यांना पाठिंबा दिला. यामध्ये आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आघाडीधर्म आम्ही पाळला. आम्हीशेवटच्या क्षणी एबी फॉर्म मागे घेतला. दिलीप माने यांनीही आपला एबी फॉर्म मागे घेतला. पण आम्हाला इथे फ्रेंडली फाईट हवी होती, पण ती होऊ शकली नाही. त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला. संजय राऊत यांनी यादीत काही बदल होईल असे सांगितले होते. त्यामुळे आम्हाला वाटले होते की सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटाने चुकून जाहीर केली आहे. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्ही काडादी यांच्यासोबत गेल्याचे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
सोलापूर दक्षिण नेहमीच कॉंग्रेसचा बालेकिल्ला- सुशीलकुमार शिंदे
अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूरबाबत शिवसेनेने गडबड केली. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून मी दोन वेळा तर आनंदराव देवकतेही निवडणून आले आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिण हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. एकादाच कधी तरी यांचा आमदार निवडून आला तर त्यांनी लगेच मतदारसंघावर दावा केला, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.